भटक्या स्थानांतरित नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:29 AM2021-05-08T04:29:41+5:302021-05-08T04:29:41+5:30
फोटो : तहसीलदार यांना निवेदन देताना........... चिमूर : पोटाची ...
फोटो : तहसीलदार यांना निवेदन देताना...........
चिमूर : पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरून त्या गावाला स्थानांतरित होणारे भटक्या जाती जमातीतील अनेक नागरिक जिल्ह्यात वास्तव्यात आहेत. कोरोनामुळे एप्रिल महिन्यात राज्यात लॉकडाऊन झाल्याने ती जमात जिथल्या तिथेच आहे. हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना कोरानाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांचे कुटुंबाचे लसीकरण करावे व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दोन महिने सरकारी रेशन अन्न धान्य देण्याची व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य इमरान कुरेशी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने भटक्या जाती जमातींचे स्थानांतरित निर्वासित नागरिक आहेत. हे नागरिक आपली कुटुंबे या गावावरून त्या गावाला पोटाची खळगी भरण्यासाठी जातात. तेथेच ते झोपडी करून राहतात. कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने लॉकडाऊन केले त्यामुळे या जमातीची पंचाईत झाली. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नाही. भीक मागायला गेले तर कोणी देत नाही. कोरोनामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला आहे. जवळ घेण्याचा प्रश्न दूरच, सध्या खायला काही नाही. अशाही परिस्थितीत आपल्या छोट्या मुलांसह कुटुंब घेऊन ही जमात जिल्ह्यात वास्तव्यात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे स्थानांतरित भटक्या नागरिकांचे लसीकरण करावे व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना दोन महिन्यांचे सरकारी रेशनचा अन्नधान्य पुरवठा करावा,
तसेच जिल्ह्यात असंघटित कामगार मजूर वर्गाची संख्या हजारोच्या घरात आहेत, त्यांनासुद्धा लॉकडाऊनचा फटका बसला आहे, त्यांना शासनाने जाहीर केलेले पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार संजय नागटिळक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले आहे. निवेदन देताना राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारिणी सदस्य इमरान कुरेशी, चुन्नीलाल कुडवे आदी उपस्थित होते.