लग्नाचे आमिष दाखवणाऱ्याला अटक
By admin | Published: May 13, 2014 11:23 PM2014-05-13T23:23:41+5:302014-05-14T01:33:55+5:30
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व्यक्तीस नागभीड पोलिसांनी गजाआड केले आहे. उल्लेखनीय असे की,
नागभीड : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्या व्यक्तीस नागभीड पोलिसांनी गजाआड केले आहे. उल्लेखनीय असे की, ही अंध महिला अद्याप बेपत्ताच आहे. यावरुन तिच्या जिवाचे काही बरेवाईट तर झाले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
आरोपींचे नाव प्रभू धर्मा राऊत (५0) असे असून तो मुळचा देसाईगंज तालुक्यातील विठ्ठलगाव येथील रहिवासी आहे. तेथे त्यांची लग्नाची बायको असून मुलेसुद्धा असल्याचे समजते. १२ वर्षापूर्वी तो तालुक्यातील बाळापूर (बुज.) येथे कामासाठी आला आणि येथेच स्थायिक झाला. येथेही त्याने आणखी एक लग्न केले. दरम्यान त्याचे बाळापूर येथीलच एका ३५ वर्षीय अंध महिलेशी संबंध आले. ही अंध महिला निराधार असून तिचा सांभाळ तिची आत्या करते. या अंध महिलेला आरोपी प्रभु राऊत याने लग्नाचे आमिष दाखवून २४ एप्रिल रोजी गावातून लग्न करतो म्हणून घेऊन गेला. जवळपास १२ दिवस बाहेर घालविल्यानंतर ६ मे रोजी तो एकटाच गावात परत आला. तो परत आल्यानंतर अंध महिलेबद्दल तिच्या नातेवाईकांनी विचारणा केली असता ती सुखरुप आहे असे सांगू लागला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नातेवाईकांनी आणीख पाच- सहा दिवस वाट पाहिली. पण नंतर आरोपी प्रभूवरचा संशय वाढत गेल्याने महिलेच्या आत्याने नागभीड पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रभू राऊत यास अटक केली आहे.(तालुका प्रतिनिधी)