चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात अस्वलाचे आगमन; नागरिकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:02 PM2019-08-23T12:02:16+5:302019-08-23T12:02:40+5:30
जंगलातून भरकटलेले एक अस्वल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बल्लारपुरातील भरवस्तीत शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जंगलातून भरकटलेले एक अस्वल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बल्लारपुरातील भरवस्तीत शिरले. वस्तीत अचानक अस्वल पाहून नागरिकांची एकच तारांबळ उडाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर वनकर्मचाऱ्यांनी अस्वलीला बेशुध्द करून जेरबंद केले.
पहाटे ४ वाजताच्या सुमारास सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना हे अस्वल, वस्ती विभागात गांधी पुतळा परिसरात दिसले. त्यामुळे प्रारंभी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. गर्दी बघून अस्वल घाबरले आणि मार्ग मिळेल त्या दिशेने ते पळत सुटले. या दरम्यान ही माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनी तिला पकडण्याचा बराच प्रयत्न केला. ती हातात न लागता पळत येथील वनकार्यालयाकडे गेली व तेथील कॉलनीतील पडक्या शौचालयात जावून बसली. वनकर्मचाऱ्यांनी तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. आजपर्यंत जंगली प्राण्यांचा शिरकाव शहराच्या वेशीपर्यंतच झाडी झुडपांच्या विरळ वस्ती असलेल्या भागातच व्हायचा. आता तर ते चक्क भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी दिसू लागले आहे. या प्रकाराने नागरिकांना भीती व चिंता वाटू लागली आहे. सदर अस्वल बरेच मोठे होते. ती नांदगाव - विसापूरकडून रेल्वे गोलपुलाकडून शहरात झाला असावा, असे बोलले जात आहे.