विंजासन येथे भिक्खु संघाचे आगमन
By admin | Published: October 29, 2016 12:52 AM2016-10-29T00:52:33+5:302016-10-29T00:52:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास ...
आज बौद्ध महोत्सव : वर्षावास समापनानिमित्त कार्यक्रम
भद्रावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समापनानिमित्त ऐतिहासीक विंजासन बुद्ध लेणी येथे वर्षावास आयोजन समितीच्या वतीने २९ आॅक्टोबर रोजी विराट बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी आज शुक्रवारी देश विदेशातील ५० पेक्षा ज्यास्त भिक्खू संघाचे विंजासन बुद्ध लेणी येथे आगमन झाले.
उद्या शनिवारला दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. राहुल बोधी (विपश्यनाचार्य, मुंबई), भदन्त सदानंद महाष्यवीर, सत्यशिल महाष्यवीर, भदन्त खेमधम्मो महास्थवीर, भदन्त कृपाशरण महास्थवीर आणि भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बोडाले यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळू धानोरकर तर स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मुख्याधिकारी विनोद जाधव, अनुसूचित जनजाती वित्त आयोग, भोपाळचे माजी अध्यक्ष इंद्रेश गजभिये, उपासक सन्नी थायलंड, दिनेश पाटील, डॉ. चंद्रबोधी नाईक, डॉ. पुरण मेश्राम, डॉ. सुरजीत सिंग हे उपस्थित राहणार आहे. समितीचे मार्गदर्शक विनयबोधी डोंगरे, सिद्धार्थ सुमन, लिना जुनघरे, कोषाध्यक्ष निलेश पाटील, सचिव संजय खोब्रागडे, उपाध्यक्ष जयदेव झाडे यांच्या मार्गदर्शनात सदर आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी भिक्खु संघाच्या उपस्थितीत अखंड महापरित्राण सुत पठण या ठिकाणी पार पडले. बौद्ध महोत्सवाला संघनायक भदन्त सदानंद महास्थावीर यांच्या नेतृत्वात देश विदेशातील ५० पेक्षा जास्त भिक्खुंचे आगमन झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)