बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कलासौंदर्य प्रवाशांनीही जपण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:12 AM2018-05-18T00:12:51+5:302018-05-18T00:12:51+5:30
ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे.
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे. हे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी आता रेल्वे प्रशासन व प्रवाशांनी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
भारतीय रेल्वे प्रशासनाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाचा देशातील सर्वात सुंदर व देखणे रेल्वेस्थानक म्हणून गौरव केला आहे. ही अत्यंत गौरवाची गोष्ट असून यामुळे या रेल्वे स्थानकाकडे प्रवाशी आकर्षिले जात आहेत. सामान्य लोकांनाही येथील नाविन्यपूर्ण सौंदर्य बघण्याची उत्कंठा आहे. या रेल्वे स्थानकावरून जाणारी प्रत्येक गाडी दहा ते पंधरा मिनीटपर्यंत येथे थांबतेच! या अवधीत गाडीमधील हौशी आणि कलाप्रेमी प्रवाशी फलाटावर उतरून या चित्र सौंदर्याचे पुतळ्यांचे अवलोकन करून त्यांचे फोटो काढतात. सेल्फी चित्र घेतात. अतुल्य भारत ही रेल्वेची खास पर्यटन गाडी या स्थानकावरून दक्षिण भारताकडे परवा गेली. या गाडीत देशातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बघणारे पर्यटक होते. ही खास गाडी या स्थानकावर सुमारे पाऊण तास थांबली होती. या वेळात या गाडीतील पर्यटकांनी भिंतीवर रेखाटलेली चित्र बघितले. पुतळ्यांसोबत फोटो काढलेत. ‘लोकमत’ने यातील काही प्रवाशांना विचारले असता, बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील चित्र आणि पुतळ्यांबाबत ऐकले होते. ते आम्हाला प्रत्यक्ष बघता आले. हे सारे बघून ताडोबा आणि या भागातील वनसंपदा कशी संपन्न आहे याची कल्पना आली. हे सारे आम्ही कॅमेऱ्यात बंद केल्याने ते आमच्या संग्रही राहणार आहेत, असे ते हे चित्र आणि पुतळे यावर प्रतिक्रिया देत म्हणाले. राज्याचे वन, अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेने बल्लारपूर रेल्वे स्थानक वेधक चित्र आणि पुतळ्यांनी सजल्याने या रेल्वे स्थानकाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, हे महत्त्व कायम ठेवण्याकरिता या चित्रांची आणि पुतळ्यांची देखरेख आणि निगा राखणे, दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचे कारण लोकांचे वागणे ! लोकांनी पुतळे जवळून बघावेत, त्यांची छायाचित्रे काढावीत हे मान्य ! पण, काही जण पुतळ्यावर बसून, त्याला हात लावून फोटो काढतात. पुतळ्यांना हलवून बघतात. हरणाचे कळप, बगडे यांचे पुतळे नाजुक आहेत. लोकांनी पुतळ्यांना हात लावू नये, हलवून बघू नये, वाघ आणि रेड्या या पुतळ्यावर बसू नये, असे सूचनाफलक पुतळ्यांजवळ लावायला हवेत. तसे अजून लावलेले नाहीत. रेल्वे सुरक्षा यंत्रणेने या पुतळ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या कला सौंदर्याने, सुशोभिकरणाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाला देशात मानाचे स्थान मिळाले आहे. त्या मानाची, नावाची जपणूक येथील चित्र आणि पुतळे यांची क्षति होऊ नये याची दक्षता प्रवाशी आणि बल्लारपूरवासीयांनी घेण्याची गरज आहे.