चंद्रपुरात कृत्रिम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:40 PM2018-09-14T22:40:56+5:302018-09-14T22:41:20+5:30
चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून पाण्यासाठी चंद्रपुरात बोंब सुरू असतानाही आजपर्यंत पाण्याची वितरण व्यवस्था चांगली होऊ शकली नाही. भर पावसाळ्यात इरई धरण तुडुंब भरले असतानाही चंद्रपुरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, चंद्रपूरकरांना या संघर्षातून कोणताही नगरसेवक वा मनपा प्रशासन मुक्त करू शकले नाही. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाºयांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.
मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे इरई धरणात पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. हिवाळ्यातच धरणाने तळ गाठला. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. इरई धरणातही मुबलक जलसाठा आहे. मात्र अद्यापही शहरात एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे.
यातून नागरिकांच्या गरजाही पूर्ण होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही.
चंद्रपुरात दररोज केव्हा पाणी पुरवठा केला जाईल, याबाबत विचारणा केली असता लवकरच केला जाईल, असे मनपाकडून सांगितले जाते. मात्र अद्यापही मनपा यासाठी मुहुर्त शोधत असल्याचे दिसते.
कंत्राटी कंपनीचे फावले
पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राटी कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आता एक दिवसाआड पाणी देणे सुरू असल्याने या कंपनीचे चांगले फावत आहे.