अविनाश पोईनकर यांना अरुण साधू पत्रकारिता फेलोशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:38+5:302021-09-27T04:30:38+5:30

चंद्रपूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, ग्रंथाली प्रकाशन मुंबई व साधू कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी ...

Arun Sadhu Journalism Fellowship to Avinash Poinkar | अविनाश पोईनकर यांना अरुण साधू पत्रकारिता फेलोशिप

अविनाश पोईनकर यांना अरुण साधू पत्रकारिता फेलोशिप

Next

चंद्रपूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, ग्रंथाली प्रकाशन मुंबई व साधू कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील एका पत्रकार किंवा मुक्तपत्रकारांना संशोधनात्मक लेखनासाठी नामांकित कै. अरुण साधू फेलोशिप देण्यात येते. यंदा सन २०२०-२१ वर्षांची ही नामांकित फेलोशिप चंद्रपूरचे मुक्तपत्रकार अविनाश पोईनकर यांना जाहीर झाली आहे. विदर्भातील पत्रकारिता क्षेत्रात ही फेलोशिप पहिल्यांदाच मिळाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बीबी या मूळ गावाचे अविनाश पोईनकर सध्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे कार्यरत आहेत. ‘आदिम माडिया समाजाचे हक्क व संस्कृतीदर्शन’ या त्यांच्या संशोधनात्मक अभ्यासविषयाची राज्य स्तरावर मूल्यमापन, मुलाखत प्रक्रियेतून निवड करण्यात आली. १ लाख रुपये या फेलोशिपचे स्वरूप असून, संशोधनात्मक लेखनाचे नामांकित ग्रंथाली प्रकाशनाकडून पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी, राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अरुण साधू स्मृती कार्यक्रमात मुक्त पत्रकार अविनाश पोईनकर यांना ही नामांकित फेलोशिप नुकतीच जाहीर केली आहे. यावेळी पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. उज्वला बर्वे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, सुवर्णा व शेफाली साधू, पराग करंदीकर, अतुल देऊळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या फेलोशिपची घोषणा करण्यात आली नव्हती. यंदा दोन वर्षांच्या फेलोशिपची घोषणा एकत्र करण्यात आली असून, अविनाश पोईनकर यांच्यासह मुंबईचे पत्रकार शर्मिष्ठा भोसले व नीलेश बुधावले यांना ही फेलोशिप विभागून देण्यात आली आहे.

अविनाश पोईनकर हे मुक्त पत्रकारासह कवी, निवेदक व युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचा ‘उजेड मागणारी आसवे’ कवितासंग्रह प्रकाशित आहे. या अगोदर मुख्यमंत्री ग्रामविकास फेलोशिपअंतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. चंद्रपुरातील घाटकूळ ग्रामपंचायतीला राज्यात आदर्श ग्राम व जिल्ह्यात स्मार्ट व सुंदर गाव पुरस्कार मिळवून देत ग्रामीण विकासात उत्कृष्ट कार्य केले आहे.

कोट

मागील वर्षभरापासून गडचिरोलीतील भामरागड परिसरात प्रत्यक्ष आदिम माडिया समाजासोबत काम करत असताना या समृद्ध संस्कृतीचे वैभव अनुभवले. समाजातील सांस्कृतिक, पारंपरिक नोंदी व हक्क या फेलोशिपच्या माध्यमातून सखोल संशोधनात्मक मांडता येईल, याचे अधिक समाधान आहे.

-अविनाश पोईनकर, चंद्रपूर

Web Title: Arun Sadhu Journalism Fellowship to Avinash Poinkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.