अचानक समोर आला वाघ, पण महिलेने लढवली 'अशी' शक्कल अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 11:02 AM2022-08-08T11:02:42+5:302022-08-08T11:09:13+5:30
खांडला येथील घटना, बकरीला केले वाघाने ठार
दिलीप मेश्राम
नवरगाव (चंद्रपूर) : गावातील गुरे, शेळ्या राखणारे निघून गेल्यामुळे खांडला येथील एक महिला शेळ्या पोहोचविण्यासाठी जंगलात गेली. दरम्यान, तिच्या मागून पट्टेदार वाघ आला. जिवाच्या आकांताने तिने चक्क जवळच्या नाल्यात उडी मारत आपला जीव वाचविला. दरम्यान, वाघाने बकरीला ठार केलेे. ही घटना रविवारी घडली.
सिंदेवाही तालुक्यातील उपक्षेत्र नवरगावअंतर्गत रत्नापूर बिटातील खांडला येथील येथील मीनाक्षी विजय धुर्वे (३०) ही रविवारी सकाळी आपल्याकडील दोन बकऱ्यांना कळपात पोहोचण्यासाठी घेऊन गेली. दरम्यान, खडकाळ नाल्याजवळ पोहोचताच पट्टेदार वाघ तिच्या पाठीमागून येत असल्याचे तिला दिसले. समोर खडकाळ नाल्याचे पाणी आणि पंधरा -वीस फुटांवर वाघ दोन्ही बाजूंनी मृत्यूने आमंत्रण दिले होते. अशा परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी तिने नाल्यातील पाण्यामध्ये उडी मारली. कशीबशी दुसऱ्या थळीला जाऊन पोहोचली. याचवेळी सोबत असलेल्या बकऱ्यांवर वाघाने हल्ला केला. यामध्ये एक बकरी ठार झाली तर दुसरी जखमी झाली. तिने काही अंतरावरील गुराख्याला सर्व प्रकार सांगितला. त्याने गावातील नागरिकांना माहिती दिली. नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिला सावरत गावात आणले. या घटनेमुळे मात्र गावात वाघाची दहशत पसरली आहे.
घटनास्थळी लावले कॅमेरे
माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी घटनास्थळ भेट दिली. वाघाने मारलेली तसेच जखमी शेळीचा पंचनामा केला. वाघावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरे लावले.
मागील वर्षी एकाचा मृत्यू
खांडला या गावालगतच मोठे जंगल असल्याने सकाळपासून जंगलाशी संबंध येतो. कुठेही जायचे झाल्यास जंगलातूनच जावे लागते. त्यामुळे सतत वाघाच्या दहशतीत जगावे लागत आहे. मागील वर्षी याच परिसरात अनिल सोनुले हे गुरे चारत असताना वाघाने हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.