आशा आंदोलनाचा ग्रामीणांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:45+5:30

मुख्यमंत्र्यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा जीआर त्वरित काढण्याचे आश्वासन दिले असतानाही अद्यापपर्यंत जीआर निघाला नसल्याने माानधन वाढीचा जीआर निघेपर्यंत शांततापूर्ण निर्दशने, मोर्चे सुरुच ठेवण्याचा इशारा आशांनी दिला आहे.

Asha agitation hits villagers | आशा आंदोलनाचा ग्रामीणांना फटका

आशा आंदोलनाचा ग्रामीणांना फटका

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात संप सुरू : ग्रामीण आरोग्यसेवेवरही संपाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : राज्यभरात ३ सप्टेंबरपासून आशा स्वयंसेविकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील
आशाही सहभागी झाल्या आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवेवर परिणाम पडला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गडचांदुरात सुद्धा आंदोलनाचे पडसाद उमटलेले आहे. येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका एकवटल्या असून दोन दिवसांपासून मुक आंदोलन सुरू आहे.
चंद्रपूर, नागपूर येथील मोर्चानंतर आरोग्यमंत्र्यांनी दोन ते अडीच पटीने मानधन वाढवून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लवकरच आचारसंहिता लागणार असून अजूनही याबाबत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय काढण्यात आला नसल्याने आशा स्वयंसेविका संतप्त झाल्या आहेत.
आशा स्वयंसेविकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला पकडून सध्या फक्त २ हजार ५०० रुपये सरासरी मानधन मिळत आहे. तर गटप्रवर्तकांना मासिक ८ हजार ७२५ रुपये मिळतात. सदर मानधन अत्यल्प असल्यामुळे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी कृती समितीची मागणी आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय सेवेत कायम करावे व अंगणवाडी सेविकांइतके मानधन द्यावे, कामाचा भार काही प्रमाणात कमी करावा, अशी त्यांची मागणी असून या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

ग्रामीण आरोग्य कोलमडले
आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेविकांपेक्षा महत्त्वाची जबाबदारी सध्या गावा-गावांत आशा स्वयंसेविकांमार्फत सांभाळल्या जात आहे. मात्र तेरा दिवसांपासून संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली असून गरीब जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे.

आशांचा संपाचा सावली येथील आरोग्य सेवेवर परिणाम
सावली : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवेत सहाय्यक म्हणून आशा वर्कर पदाची निर्मिती करण्यात आली. या आशा वर्कर पदावर नियंत्रक म्हणून गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली असून माता-बाल मृत्यू दर कमी करणे, प्रस्तुती सेवा, लसीकरणासह साथरोग नियंत्रण कार्यक्रम कौटुंबीक सर्व्हेचे कामही त्या करतात. मात्र मोबदला कमी आणि कामे अधिक अशी अवस्था आशांची आहे. महाराष्ट्र शासन मात्र भेदााव करीत असल्याने मानधन वाढीसह अन्य मागण्यांकरिता संप पुकारण्यात आला आहे. परिणामी ग्रामीण आरोग्य सेवेवर परिणाम पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा जीआर त्वरित काढण्याचे आश्वासन दिले असतानाही अद्यापपर्यंत जीआर निघाला नसल्याने माानधन वाढीचा जीआर निघेपर्यंत शांततापूर्ण निर्दशने, मोर्चे सुरुच ठेवण्याचा इशारा आशांनी दिला आहे. त्यामुळे सावली परिसरात आरोग्य सेवा कोलमडली असून नागरिकांना आशा वर्कर अभावी आरोग्यसेवा मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातून वनिता उद्योजवार, सायली बावणे, विजया गेडाम, सुनीता राऊत यांच्यासह तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत कार्यरत आशा वर्कर्स गटप्रवर्तकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.यामुळे ग्रामीण आरोग्य धोक्यात येण्याची शक्यत आहे.

देशातील काही राज्यांमध्ये आशा स्वयंसेवकांना दरमहा दहा हजार रुपयापर्यंत मानधन दिले जाते. गावातील आरोग्याची जबाबदारी आम्ही सांभाळत असून घरोघरी गृहभेटी देण्याचे आम्ही काम करतो. तसेच स्तनदा माता, गरोदर माता यांच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घेतो.मात्र आम्हाला अत्यल्प मानधन दिले जाते. शासनाने त्वरित आमच्या मानधनामध्ये वाढ करावी व आम्हाला न्याय द्यावा.
- विजया मिलमिले, आशा स्वयंसेविका
९ सप्टेंबरला गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात माझ्या पत्नीची प्रसूती झाली. पत्नीला दोन-तीन दिवस खूप त्रास झाला. मात्र आरोग्यसेविकांनी भेट दिली नाही. आशा स्वयंसेविकांचा संप सुरू असल्याने त्या पण येऊ शकल्या नाही. पत्नीला खूप त्रास झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पण तिथे सुद्धा आरोग्य विभागाचे कोणीही कर्मचारी नव्हते. आशा स्वयंसेविकांचा संप सुरू असल्यामुळे मला हाल सहन करावे लागले.
- सतीश बावणे, बिबी

Web Title: Asha agitation hits villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा