आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

By साईनाथ कुचनकार | Published: December 13, 2023 06:45 PM2023-12-13T18:45:21+5:302023-12-13T18:45:37+5:30

विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांची भेट घेतली.

Ashram school students got a chance to meet ISRO scientists An initiative of the Integrated Tribal Development Project Office |  आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

चंद्रपूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात आश्रमशाळेतून वैज्ञानिक निर्माण व्हावेत, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा इस्रो शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली असून, त्यांच्या ज्ञानातही भर पडली आहे. चंद्रपूर प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील १६ विद्यार्थी व चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत ३ असे एकूण १९ विद्यार्थी इस्रोच्या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झाले होते. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरूगानंथम एम. यांच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांना इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी मिळाली. या शैक्षणिक दौऱ्यादरम्यान सहायक प्रकल्प अधिकारी बोंगिरवार तसेच एस. श्रीरामे, एम. डी. गिरडकर, एच. डी. पेदोंर आदी कर्मचारी विद्यार्थ्यांसमवेत होते.

याठिकाणीही दिली भेट
विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती तसेच चंद्रयान प्रक्षेपणात वापरण्यात आलेल्या विविध साधनांची माहिती शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यासोबतच श्रीरंगपट्टनम येथील टिपू सुलतान पॅलेस, टिपू सुलतान समाधी, वृंदावन गार्डन, प्राणी संग्रहालय येथे भेट दिली तसेच म्हैसूर शहरातील ऐतिहासिक व भौगोलिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी तसेच या माध्यमातून एखादा शास्त्रज्ञ घडू शकतो, हा या सहलीमागचा उद्देश होता. यातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होईल. - मुरूगानंथम एम. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर
 

Web Title: Ashram school students got a chance to meet ISRO scientists An initiative of the Integrated Tribal Development Project Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.