आश्रमशाळांना मिळणार नवे शिक्षक, बेरोजगार उमेदवारांना मिळणार संधी
By साईनाथ कुचनकार | Published: May 11, 2023 03:01 PM2023-05-11T15:01:15+5:302023-05-11T15:01:34+5:30
उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरिता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयांसह एम.ए., एम.एससी., बी.ए. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय शाळांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांची शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन सत्रात आश्रमशाळांना नवे शिक्षक मिळणार आहे. यासाठी प्रशासनाने अर्ज मागविले असून १५ मेपर्यंत उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे.
उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरिता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयांसह एम.ए., एम.एससी., बी.ए. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. माध्यमिक शिक्षक पदाकरिता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह बी.एस्सी.,बी.एड., प्राथमिक शिक्षक पदाकरिता सर्व विषय घेता यावे, यासह बी.ए.,डी.एड., तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरिता मराठी व इंग्रजी विषयासह बी.ए.,डी.एड. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे गरजेचे आहे. या शिक्षकांना शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे. आश्रमशाळेच्या २० किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या पत्रानुसार, आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी-अधिक करण्याचे, तसेच इतर बाबतींत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे, तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना राहील, असे सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस. जी. बावणे यांनी कळविले आहे.