सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का? अनेक जण लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:04 PM2021-05-31T12:04:59+5:302021-05-31T12:06:18+5:30
Chandrapur news घरपोच गॅस डिलिव्हरी करणारेच जर पॅाझिटिव्ह असतील तर सर्वांचेच आरोग्य धोक्यात सापडेल. त्यामुळे आपल्याला घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घेताना काळजी बाळगणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे गॅस एजन्सी बंद असल्या तरी घरगुती सिलिंडरचे वितरण सुरू आहे. घरपोच गॅस डिलिव्हरी करणारेच जर पॅाझिटिव्ह असतील तर सर्वांचेच आरोग्य धोक्यात सापडेल. त्यामुळे आपल्याला घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घेताना काळजी बाळगणे गरजेचे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाखांहून अधिक घरगुती गॅस वापरणाऱ्यांची संख्या आहे. यातील दीड लाखाहून अधिक ग्राहक हे शहरी भागात राहणारे आहेत. या सर्वांना भारत गॅस, एचपी, इंडेन गॅस अशा कंपन्याच्या माध्यमातून घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. घरोघरी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्यांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. यातील काही जण बाधित झाले होते. परंतु, बहुतेकांचे लसीकरण अद्यापही करण्यात आले नाही. यांना दररोज अनेकांच्या घरी जाऊन घरपोच सिलिंडरचा पुरवठा करावा लागत असल्याने अनेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी तिसऱ्या लाटेच्या पूर्वी लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सिलिंडर सॅानिटाईज केले का?
कोणालाही ओझे उचलावे वाटत नाही. त्यामुळे घरातील मंडळी किचनमध्ये सिलिंडर ठेवण्याची विनंती त्याला करीत असतात. नेहमीचेच संबंध असल्यामुळे डिलिव्हरी बाॅयदेखील किचनपर्यंत सिलिंडर नेऊन देतो. परंतु, सिलिंडर सॅनिटाईझ करून घेण्याची कोणीही तसदी घेत नाही.
अनेक जण आढळले पॉझिटिव्ह
चंद्रपूर शहरात घरपोच गॅस पोहोचता करणाऱ्यांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. त्यापैकी काही जणांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु, आजपर्यंत अनेकांना लस उपलब्ध झाली नाही. घरोघरी सेवा देणाऱ्या या वितरकांसह गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जबाबदारी कुणाची?
चंद्रपूर जिल्ह्यात गॅस वितरित करणाऱ्या तसेच इतर जीवनावश्यक साहित्य, तसेच खाण्याचे पदार्थ व इतर सेवा घरपोच देणाऱ्या वितरकांना डिलिव्हरी बॉयला लसीकरण देण्याची जबाबदारी कुणाची आहे, तसेच त्यांची वेळोवेळी कोरोना तपासणी केली जाते काय, असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत. बहुतेक घरपोच सेवा देणारे आजही मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गॅस वितरक
मास्क घालूनच सिलिंडरचा पुरवठा करीत असतो. आम्ही अनेकांच्या संपर्कात येत असल्याने आम्हाला लसीकरण करणे गरजेचे होते. मात्र १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद झाल्याने माझे लसीकरण व्हायचे आहे.
-गॅस वितरक