खासगी कॉन्व्हेंटमधील अन्यायाबाबत शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:50+5:302021-09-05T04:31:50+5:30
चंद्रपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक-पालक एकता मंच व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभागातर्फे खासगी (कॉन्व्हेंट) इंग्रजी ...
चंद्रपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक-पालक एकता मंच व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभागातर्फे खासगी (कॉन्व्हेंट) इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याबाबतचे निवेदन अपर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले. राज्यातील ४१ हजार खासगी स्कूलमधील शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे शोषण थांबवावे, गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करावी, शिक्षक कर्मचाऱ्यांना एमईपीएस १९८१ च्या नियमानुसार पूर्ण वेतन, वैद्यकी लाभ व महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना मॅटर्निटी लिव्ह विथ पे देण्यात यावे, शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार बँकेतून करण्यात यावा, ईपीएफ व ग्रॅच्यूईटीची पूर्ण रक्कम देण्यात यावी, राज्यातील अनेक प्रायव्हेट स्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना, ग्रॅच्युइटी देण्यात आली नाही, त्याची सरकारतर्फे उच्चस्तरीय किंवा ईडीतर्फे चौकशी करण्यात यावी, राज्यातील आर्थिक घोटाळा करणाऱ्या खासगी शाळांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी म.रा. शिक्षक-पालक एकता मंच व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभागप्रमुख विवेक आंबेकर, शिक्षक-पालक एकता मंचचे सचिव संजय उपाध्ये, उपाध्यक्ष किशोर मोहुले, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश रामटेके, सहसचिव ॲड. पवन मेश्राम, श्रीकांत उपाध्याय, संजय कोतपल्लीवार आदी उपस्थित होते.