कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आठ महिन्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:52 AM2023-09-27T11:52:13+5:302023-09-27T11:52:44+5:30

मध्यरात्री दोघांना अटक

Assault on Junior Resident Medical Officer in chandrapur; Two were arrested at midnight | कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आठ महिन्यातील दुसरी घटना

कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आठ महिन्यातील दुसरी घटना

googlenewsNext

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरावर रुग्णांच्या नातेवाईकाने हल्ला करुन मारहाण केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. रोहित होरे (२७) असे जखमी डॉक्टरांचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी रात्रीच १ वाजताच्या सुमारास त्या मारेकऱ्यांना अटक केली. साजिद शेख (२३) रा. दुर्गापूर, मुद्दतसीर सुलतान खान (२३) रा. वाशिम हल्ली मुक्काम नगिनाबाग चंद्रपूर या दोघांना अटक केली आहे. याबाबतची माहिती महाविद्यालयातील निवासी व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना होताच त्यांनी महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.

सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास निवासी डॉ. रोहित होरे हे अपघात विभागात एका रुग्णांवर उपचार करीत होते. दरम्यान, साजिद शेख, मुद्दतसीर खान हे दोघे आठ वर्षीय मुलीला घेऊन रुग्णालयात आले. त्या आठ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत होते. त्यामुळे ती मुलगी वेदनेने व्हिवळत होती. यावेळी त्या दोघांनी त्या मुलींवर उपचार करण्यास सांगतिले. डाॅ. रोहित होरे यांनी तत्परता दाखवत उपचार करत असतानासुद्धा त्या दोघांनी शिवीगाळ करीत त्याना मारहाण केली.

डॉ. रोहितने संधी साधून बाहेर पळ काढून आपला जीव वाचविला. ही बाब सहकारी डॉक्टरांना माहिती होताच निवासी डॉक्टर व शिकाऊ डॉक्टरांनी एकच गर्दी केली. घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिंग राजपूत लगेच आपल्या चमूसह वैद्यकीय महाविद्यालयात हजर झाले. पोलिसांनी लगेच आरोपी साजिद शेख, मुद्दतसीर सुलतान खान या दोघावर कलम ३५३, ३३२, १०९, ५०४ (३४) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. डॉक्टरावर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.

निवासी डॉक्टरांनी पुकारला संप

यापूर्वीही चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरवर हल्ला झाला होता. यावेळी सुरक्षारक्षक नेमण्यासह विविध मागण्यासाठी कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले होते. आता सोमवारी पुन्हा डॉक्टरवर हमला झाला. वाढत्या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सकाळपासून संप पुकारला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील रुग्णांची तपासणी डॉक्टर करत आहेत.

Web Title: Assault on Junior Resident Medical Officer in chandrapur; Two were arrested at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.