चंद्रपूर : म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 08:00 PM2021-05-29T20:00:25+5:302021-05-29T20:01:06+5:30

पालकमंत्र्यांनी दिली ५ लाख रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी 

Assistance from the Mineral Development Fund now for the treatment of mucormycosis sufferers | चंद्रपूर : म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत

चंद्रपूर : म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिली ५ लाख रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी 

चंद्रपूर : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च ७ लाख रुपयांच्या वर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्यावरचा आर्थिक कमी करण्याच्या उद्देशाने खनिज विकास निधीतून ५ लाखांपर्यंत इंजेक्शनच्या खर्चास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष लाभ २९ मे पासून सुरू होणार आहे.

म्युकरमायकोसिस आणि इतर बुरशीजन्य संसर्गाच्या सर्व रुग्णांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना मान्यता देण्यात आलेली आहे. या अंतर्गत क्राइस्ट रुग्णालय व डॉ.वासाडे रुग्णालय या दोन खाजगी रुग्णालयामध्ये ४० बेड कार्यान्वित करण्यात आले असून म्युकरमायकोसिस आणि इतर बुरशीजन्य संसर्गाच्या आजाराकरिता रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहे. या रुग्णालयांत म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांना उपलब्ध १९ पॅकेजेस अंतर्गत मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया पुरविण्यात येत असून अॅम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन शासनाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत पुरविण्यात येत आहे.

असा आहे उपचाराचा एकत्रित खर्च 

म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. खाजगी रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस ग्रस्त रुग्णांच्या उपचाराकरिता अॅम्फोटेरिसिन-बी (लिपोसोमल) इंजेक्शनची प्रती नग किंमत ६२४७ रुपये असून प्रतिदिन, प्रति रुग्णाला ६ इंजेक्शन देणे आवश्यक आहे. या आजारावरील रुग्णाला वीस दिवस इंजेक्शन द्यावयाचे असते. त्यामुळे एका रुग्णाला ७ लाख ४९ हजार ६४० इतका एकत्रित खर्च येत असतो. यामुळे रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. सदर रुग्णांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांना आवश्यक असलेले अॅम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध साठ्यानुसार (अॅम्फोटेरिसिन-बी प्लेन, इमल्शन आणि लिपोसोमल ) कमाल ५ लाख रुपयांपर्यंतचे इंजेक्शन रुग्णांना मोफत पुरविण्यात येईल.

डॉक्टरांची टीम

म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी क्राइस्ट रुग्णालय येथे ९ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नेमण्यात आलेली आहे. त्यासोबतच उपचारासाठी लागणारी उपकरणे, साधनसामुग्री, सुसज्ज ऑपरेशन थेटर, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आलेले आहे. या आजाराची माहिती व्यापक प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित करण्यात आले असून ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कोरोनातुन बरे झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची माहिती एस.एम.एसद्वारे दैनंदिन घेतल्या जात आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींनी वरचेवर तपासणी करावी, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवणे, तसेच इतर आरोग्य विषयक सूचना जिल्हा प्रशासनामार्फत दैनंदिन देण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजाराचे ६९ रुग्ण आढळून आलेले आहे. आजपर्यंत ४८ रुग्णांवर उपचार सुरू असून ८ रुग्ण या आजारातून बरे झालेले आहे. त्यापैकी वरोरा तालुक्यातील एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. योग्य वेळी उपचार झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो.
 

Web Title: Assistance from the Mineral Development Fund now for the treatment of mucormycosis sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.