विवाह स्वागत सोहळ्यात चक्क नवरदेवानेच केली हत्या; नऊ जणांना कारावासाची शिक्षा
By परिमल डोहणे | Published: April 7, 2023 06:01 PM2023-04-07T18:01:42+5:302023-04-07T18:03:45+5:30
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : आरोपींत दोन मृतांचा समावेश
चंद्रपूर : लग्नानंतर धूमधडाक्यात स्वागत समारंभ सुरू असतानाच चक्क नवरदेवानेच वाद उकरून काढत एका दाम्पत्याशी भांडण सुरू केले. नवरदेवाला राग इतका अनावर झाला की त्याने आपल्या सहकाऱ्यांसह त्या दाम्पत्याला काठी, कुऱ्हाड व जांबिया तलवारीने बेदम मारहाण केली. यात पती संतोषसिंह टाक यांचा मृत्यू झाला. तर पत्नी रिनाकौर संतोषसिंह टाक या जखमी झाल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने न्यायालयीन लढाई लढली अन् ती जिंकलीही. चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ गिरीश जी. भालचंद्र यांनी हत्येच्या गुन्ह्यातील नऊही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ८ हजार ५०० रुपयांचा दंड व सहकलम अंतर्गत १ ते ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
करणसिंग टाक (२२), आचीसिंग सबजितसिंग टाक (३६), सगतसिंग देवीसिंग बावरी (३२), भीमसिंग सबजितसिंग टाक (२६), विक्रमसिंग पापासिंग सबजितसिंग टाक, बलदेवसिंग सबजितसिंग टाक (४०), सबजितसिंग टाक (सर्व रा. चंद्रपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर कविताकौर बावरी व सतकौर सबजितसिंग टाक या दोघांचा मृत्यू झाला आहे.
बाबूपेठ येथील जुनोना चौक विक्तूबाबा मंदिराजवळ ११ जून २०१८ रोजी आरोपी करणसिंग टाक याच्या विवाहाचा स्वागत समारंभ सुरू होता. या स्वागत समारंभात आरोपी करणसिंग टाक याने सहकाऱ्यांच्या मदतीने जुन्या वादातून भांडण करत संतोषसिंह टाक व त्याची पत्नी रिनाकौर संतोषसिंह टाक या दाम्पत्याला जांबिया तलवार व कुऱ्हाड, काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संताेषसिंह टाक यांचा मृत्यू झाला, तर पत्नी रिनाकौर गंभीर जखमी झाल्या होत्या.
याप्रकरणी रिनकौर यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध कलम ३०२, ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. मोरे यांनी तपास करत सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ गिरीश जी. भालचंद्र यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा, ८ हजार ५०० रुपयांचा दंड व सहकलम अंतर्गत १ ते ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. संदीप नागापुरे यांनी काम पाहिले.
निकाल लागण्यापूर्वीच दोन आरोपींचा मृत्यू
११ जून २०१८ रोजी संतोषसिंग टाक यांची नऊ जणांनी हत्या केली होती. याबाबत सुमारे पाच वर्षे न्यायालयात खटला चालला. शेवटी बुधवारी जिल्हा सत्र न्यायधीशांनी निकाल देत नऊ जणांना आजन्म कारावास ठोठावला. परंतु, नऊ आरोपींपैकी सतकौर सबजितसिंग टाक व कविताकौर बावरी या दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.