शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:38 AM2019-07-12T00:38:24+5:302019-07-12T00:39:34+5:30
पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकºयांना बांबू टिश्यू कल्चरसाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान तसेच दर्जेदार टिश्यू कल्चरचा पुरवठा केला जाणार आहे.
जिल्ह्यातील हवामान बांबू लागवडीसाठी पोषक आहे. शेती व शेतकरी मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येऊ लागला आहे. शेतीमालाला मिळणारे अल्पदर, अपुरा वीजपुरवठा, व्यापाºयांची मनमानी आदी विविध कारणामुळे शेतकºयांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतीतील शाश्वत उत्पन्न कमालीचे घडले आहे. शेती व्यवसायाबाबत शेतकºयांसह नव्या पिढीतही प्रचंड उदासीनता निर्माण होऊ लागली. अनेक शेतकरी शेती करण्यासाठी धजावत नाही. रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत. शेतकºयांची मुले शेतीपासून लांब चालली. हंगामी नोकरी निमित्ताने शहरात जात आहेत. यावर राज्य सरकारने पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून चार हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना ८० टक्के अनुदानावर दर्जेदार बांबूचे टिश्यू कल्चर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार हेक्टरच्या पुढील शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर हे टिश्यू कल्चर उपलब्ध केल्या जाणार असून हेक्टरी ६०० रोपे दिली जाणार आहेत.
टिश्यू कल्चरमध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बांबूच्या विविध जातींची लागवड केली जाणार आहे. यामध्ये भारतातील ‘कटांग’ आणि ‘माणगा’ या दोन स्थानिक जातींबरोबरच इतर पाच जातींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती वन विभागाने दिली.
जिल्ह्यातील हवामान बांबूला पोषक
भारतात सुमारे २६ हजार कोटींची बांबूची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत शेतात बांबूचे उत्पादन अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकºयांनी बांबू शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली. अल्पभूधारक शेतकºयांनी बांधावर बांबू शेती केल्यास आर्थिकदृष्ट्या परवडू शकते. फर्निचर, प्लायवूड, काटेंज, शोभेच्या वस्तू व बांधकाम व्यवसायात बांबूचा उपयोग केला जातो.