ऐतिहासिक परकोटावरील अतिक्रमण पोहोचले पोलीस ठाण्यात
By admin | Published: February 21, 2016 12:30 AM2016-02-21T00:30:10+5:302016-02-21T00:30:10+5:30
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक परकोटाची झालेली पडझड व काही ठिकाणी याच परकोटावर झालेल्या ...
रितसर तक्रार : पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक, आमदार व मनपा आयुक्तांवर आरोप
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक परकोटाची झालेली पडझड व काही ठिकाणी याच परकोटावर झालेल्या अतिक्रमणाच्याविरोधात शनिवारी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची भेट घेऊन त्यांनाही तक्रारीची एक प्रत देण्यात आली.
परकोटाची झालेली पडझड व त्यावरील अतिक्रमणाला पुरातत्व विभागाचे अधीक्षक, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त, तत्कालीन स्थानिक आमदार जबाबदार असल्याचा आरोप बेले यांनी तक्रारीतून केला आहे. आता या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला चहुबाजूंनी परकोट आहे. तसेच परकोचे जटपुरा गेट, पठाणपुरा, अंचलेश्वर गेट, बिनबा गेट असे चार दरवाजे आहेत. तसेच आठ मुख्य खिडक्या आहेत. सन १४६१ नंतर गोंडराजांनी हा किल्ला बांधला. परकोटाची उंची १५ ते २० फुटांची असून ते साडेसात मैल लांबीचे आहे. सदर ऐतिहासिक किल्ला हा जवळपास ४५० ते ५०० वर्षे जुना आहे. एनसियंट मॉनुमेंटस् अॅन्ड आरकियोलॉजिकल साईटस् अॅन्ड रिमेन्स अॅक्ट १९५८ या अधिनियमानुसार या किल्ल्याचे संरक्षण होणे गरजेच आहे.
परंतु पुरातत्व विभागाकडून कोणत्याही कर्तव्याचे पालन होत नसल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याची पडझड होण्यास पुरात्वव विभागाचेच अधिकारी जबाबदार असून या अधिकाऱ्यांशी संगनमत करूनच परकोटाची तोडफोड करून तेथे घर, दुकाने, चिकन सेंटर, पानठेला आणि रस्ते बांधले जात असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने पुरातत्त्व विभागाची कोणतीही पूर्व परवनागी न घेता नियमांची पायमल्ली करून बिनबा गेट व अंचलेश्वर गेट येथे किल्लाला लागून शौचालय बांधले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामाला इजा पोहोचली असल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे. यासोबतच जटपुरा गेट ते रामाळा तलाव रस्त्याने किल्ल्याला लागून आमदार निधीतून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय बांधण्यात आले आहे. ते देखील नियमबाह्य असल्याचा आरोप बेले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)