एटीएम केंद्रांची सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:13 AM2017-12-22T00:13:49+5:302017-12-22T00:14:18+5:30
अलीकडे चोरी, दरोडे लुटमारीच्या घटना वाढत आहे. पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काहीही करताना दिसून येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम फोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अलीकडे चोरी, दरोडे लुटमारीच्या घटना वाढत आहे. पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काहीही करताना दिसून येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम फोडले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जिल्हाभरात स्टिंग आॅपरेशन केले असता ज्या ठिकाणी रोख रक्कम असते, त्या एटीएम केंद्रांची सुरक्षाच धोक्यात असल्याचे दिसून आले.
चंद्रपुरातील एटीएम केंद्र कितपत सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी ‘लोकमत’ने बुधवारी रात्री शहरात फेरफटका मारून एटीएम केंद्रांची पाहणी केली. यावेळी काही बँकांच्या एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक तैनात असल्याचे दिसले. काही ठिकाणी तर बंदुकधारी सुरक्षा रक्षक दिसून आले. मात्र बहुतांश एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षकच दिसून आले नाही. नव्हेतर सुरक्षा रक्षकाविनाच या केंद्रांचा कारभार सुरू असल्याचे दिसले. चंद्रपूर शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅक, बँक आॅफ महाराष्टÑ, बँक आॅफ बडोदा, आयसीआयसी बँक, आयडीबीआय बँक यासारख्या राष्टÑीयकृत बँक आणि मध्यवर्ती सहकारी बँक, अर्बन बँक यासारख्या स्थानिक बँकांच्या शाखा चंद्रपुरात कार्यरत आहेत. या सर्व बँकांचे एटीएम केंद्र शहरातील विविध भागात कार्यरत आहेत. यातील बहुतांश एटीमएम केंद्रात रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक दिसले नाही. कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेचे व छोटाबाजारातील आयसीआयसीआय, युनियन बँक, तुकूम येथील स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक, बँक आॅफ इंडिया या बँकाच्या एटीमएम केंद्र दिवसाही चौकीदार व सुरक्षा रक्षक दिसले नाही.
वरोरा शहरात बहुतांश बँकांचे एटीएम आहेत. आनंदवन, आनंद निकेतन महाविद्यालयासमोरील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नाही. मात्र वरोºयातील काही एटीएम केंद्रात दिवसा सुरक्षा रक्षक नसला तरी रात्री मात्र सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली जात असल्याचे दिसले.
सिंदेवाहीत स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडिया, यांचे तीन एटीएम केंद्र आहेत. बुधवारी रात्री या तीनही एटीएम केंद्रात एकही सुरक्षा रक्षक आढळले नाही. खासगी कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक नेमले आहेत, अशी माहिती मिळाली. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा रक्षक दिसले नाही. बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर पैसे नसल्याच्या सबबीखाली नेहमीच बंद असते, असे नागरिकांनी सांगितले.
नागभीड येथे चारपैकी तीन एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक नाही. केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केंद्रातच २४ तास सुरक्षा रक्षक असतो. गोंडपिपरीत बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे तीन केंद्र कार्यरत आहेत. त्यातील केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्येच सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असल्याचे आढळले.
चिमुरात एकूण तीन एटीएम ग्राहकाच्या सेवेत आहेत.यातील बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया या दोन्ही बँकेच्या एटीएममध्ये प्रारंभापासूनच सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नाही. तसेच या दोन्ही एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा नियमित सुरू नसतात.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्ये मात्र सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
ेसुगावा लागेल; मात्र घटना टाळण्यासाठी काय?
जिल्ह्यातील विविध शहरातील अनेक एटीएम केंद्राचा कारभार सुरक्षा रक्षकाविनाच सुरू आहे. या एटीएम केंद्रात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून संबंधित यंत्रणा मोकळी झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एखादी अनुचित घटना घडली तर त्याचा सुगावा लागू शकतो. मात्र घटना टाळण्यासाठी यंत्रणा हतबल ठरण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते.
स्टेट बँकेचे दोन्ही एटीएम वाऱ्यावर
जीवती : जीवती शहरात एक एटीएम तर पाटण येथे एक एटीएम असे दोन्ही एटीएम हे स्टेट बँक आॅफ इंडियाचे आहेत. पण या दोन्ही एटीएममधील सुरक्षा वाऱ्यावर आहे. हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मात्र येथील एटीएम केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, या केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याचे दिसून आले. जीवती येथील एटीएममधून हरविलेल्या एटीएम कॉर्डद्वारे पैसे काढण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र येथे कॅमेरे नसल्याने त्या व्यक्तीला पकडणे पोलिसांना शक्य झाले नाही.