अवैध दारूविक्रीच्या मुद्यावरून दुर्गापुरात वातावरण तापले

By admin | Published: October 4, 2016 12:46 AM2016-10-04T00:46:23+5:302016-10-04T00:46:23+5:30

दुर्गापुरात सुरू असलेल्या कथीत अवैध दारूविक्री आणि ताडीविक्रीच्या प्रकरणावरून घडलेल्या...

The atmosphere prevailed in Durgapur due to illegal liquor issue | अवैध दारूविक्रीच्या मुद्यावरून दुर्गापुरात वातावरण तापले

अवैध दारूविक्रीच्या मुद्यावरून दुर्गापुरात वातावरण तापले

Next

विनयभंग व मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा- महिलेचा आरोप
‘त्या’ दारूविक्रेत्यांना तडीपार करा -व्यापारी संघटनेची मागणी
दोन्ही गटांनी दिला आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर : दुर्गापुरात सुरू असलेल्या कथीत अवैध दारूविक्री आणि ताडीविक्रीच्या प्रकरणावरून घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता हे प्रकरण सामूहिक आंदोलनाकडे वळत आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात दुर्गापूर पोलिसांवर कायदा सुव्यवस्थेचा ताण वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
गावात दारूविक्री आणि ताडीविक्रीचा व्यवसाय अवैधपणे करीत असल्याचा आरोप असलेल्या महिलेने आपणास भर रस्त्यावर मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, दुर्गापूर-उर्जानगर व्यापारी संघटना आणि नागरिकांनी संबंधित कुटूंब आणि महिला अवैध दारूविक्री आणि ताडीविक्री करीत असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून तडीपार करावे, अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे.
या दोन्ही गटांनी सोमवारी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेवून आपली बाजू मांडली. रंजीता गोटपट्टीवार यांच्या बाजूने झालेल्या पत्रकार परिषदेत सदर महिलेसह त्यांचे कुटूंबिय आणि सविता कांबळे, अ‍ॅड रिना धवन, गीता रामटेके, सविता सहारे, नेहा मेश्राम, शंकर निमसरकार, शेख मुबारक आदी उपस्थित होते. ते म्हणाले, १२ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या दरम्यान मुकूंद आंबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परशुराम गोटीपट्टीवार व त्यांच्या पत्नीला भर रस्त्यावर मारहाण केली. या घटनेची तक्रार करुनसुद्धा आरोपींना अटक केली नाही. आरोपीना अटक न केल्यास ८ आॅक्टोंबरपासून कुटूंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा पीडित महिलेने दिला. पीडित महिलेचे पती परशुराम गोटीपट्टीवार पूर्वी अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करीत होते. या कारणावरुन मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. पीडित महिला पतीचा बचाव करण्यासाठी गेली असता, आरोपींनी तिलासुद्धा मारहाण केली. तरीही पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)

सामाजिक शांततेसाठी ‘त्यांना’
तडीपार करण्याची मागणी
दरम्यान, दुर्गापूर-उर्जानगर व्यापारी संघटना आणि नागरिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अवैध ताडी व दारूविक्री करून सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या परशुराम गोटीपट्टीवार व त्यांच्या पत्नीला तडीपार करा, अशी मागणी केली. हे कुटूंब आणि संदर महिला ताडी व अवैद्य दारुविक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आंबेकर यांनी अनेकदा पोलिसात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे १२ सप्टेंबरला सकाळी गोटीपट्टीवार यांच्या पत्नीने चिडून जावून आंबेकर यांना रस्त्यात अडवून मारहान केली. यात तिच्या पतीनेही साथ दिली. जीवे मारण्याची तसेच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. याच भावनेतून हे खोटे आरोप करण्यात आले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. गोटीपल्लीवार याच्यावर ३७ व त्यांच्या पत्नीवर सात गुन्हे पोलिसात दाखल आहेत, त्यावरून कायदा-सुव्यवस्था कोणामुळे बिघडत आहे, याचा प्रशासनाने विचार करावा, असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रशासनाने गोटीपट्टीवार दामप्त्याला तडीपार करावे, अन्यथा प्रशासनाविरूद्ध आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला मुकूंदा आंबेकर यांच्यासह डॉ. वाघमारे, गजानन नालमवार, डी. आर. भाले, अंजया मुसमनवार, रंजना दारोकर, कल्याणी आंबेकर आदी उपस्थित होते.

Web Title: The atmosphere prevailed in Durgapur due to illegal liquor issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.