मुख्यालयी राहण्यावरून वातावरण तापले
By admin | Published: October 24, 2015 12:34 AM2015-10-24T00:34:59+5:302015-10-24T00:34:59+5:30
तालुक्यातील मौजा सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत आहेत.
वरिष्ठांकडे तक्रार : व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांकडून बचाव
गोंडपिंपरी : तालुक्यातील मौजा सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण सात शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी बरेच शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे करुन याबाबतची तक्रार शिक्षण विभागाच्या वरिष्ठांकडे केली. मात्र याच तक्रारी विरोधात शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या हितार्थ बचावात्मक पवित्रा घेतल्याने सकमुरात चांगलेच वातावरण तापले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांचा मुख्यालयाला ‘खो’ हा मुद्दा सकमुरात गाजत असला तरी संपूर्ण तालुक्यात हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहावे तसेच नियोजित कर्तव्ये पार पाडावी, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र अलिकडच्या काळात ग्राम खेड्यात राहण्यास नापसंती दर्शविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज तालुक्यातील बहुतांश विभागाचे कर्मचारी मुख्यालयाला न राहता अधिकाऱ्यांशी समन्वय व मुकसंमती घेवून मुख्यालयाला ‘खो’ देवून घरभाडे, प्रवास भत्ता, नक्षलग्रस्त भत्ता आदी वेतनाअतिरिक्त भत्त्यांची उचल करीत आहे. यामुळे शासनाची अनेक कामे रेंगाळलेली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
अगदी याच मुद्दयावरुन तालुक्यातीेल सकरमूर गावातील जि.प. शाळा शिक्षक हे मुख्यालयी राहात नसल्याबाबतची तक्रार करण्यात आली. मात्र शिक्षक हितार्थ शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी वर्तमान पत्रातून शिक्षकांची बाजू मांडून शाळेची प्रगती होत असल्याची बाजू मांडली आहे. एकाच गावात वास्तव्यास राहणाऱ्या मात्र वेगवेगळी बाजू मांडणाऱ्या काही पालक तर काही नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचे जाणवत असून शिक्षकांचा मुख्यालयाला खो हा मुद्दा आता तालुक्यात सर्वत्र चर्चील्या जात आहे. यासंदर्भात तेथील मुख्याध्यापिकांनी नवे कारण पुढे केले असून गणेशोत्सवादरम्यान सक्ती रकमेनुसार वर्गणी अदा न केल्याने सदर प्रकार घडल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकंदरीत या सर्व प्रकारावरुन सकमूर गावात मुख्यालयाला खो या मुद्दयावरुन चांगलीच खडाजंगी उडाली आहे. तापलेल्या राजकारणाचे चटके हे विद्यार्थ्यांना बसू नये, याची खबरदारी पालकांसह शिक्षकांचीही आहे. हे तेवढेच सत्य. (तालुका प्रतिनिधी)