ब्रह्मपुरीच्या विद्युत कार्यालयावर हल्लाबोल
By admin | Published: June 30, 2017 12:50 AM2017-06-30T00:50:07+5:302017-06-30T00:50:07+5:30
येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांना शारीरिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
वीज बिलांची केली होळी : विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांना शारीरिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांनी गुरुवारी दुपारी झाशी राणी चौकातील कार्यकारी अभियंता कार्यालयावर आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करून वीज बिलाची होळी केली.
सदर मोर्चा गुरूवारी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातून काढण्यात आला. मोर्चात शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहक सहभागी होऊन वीज वितरण कंपनीच्या विरोधात नारेबाजी करीत कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडकले. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहा. कार्यकारी अभियंता, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, माजी नगरसेवक विलास विखार, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे आदींच्या उपस्थितीत संयुक्त चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये मागील वीज बिलाच्या आधारे सरासरी रिडिंग विचारात घेऊन वीज बिल तयार करण्यात यावे, मुदतीच्या आत वीज बिल वितरित करावे, यापूर्वी ज्या ग्राहकांना बिल देण्यात आले त्यांनी मुदत गेल्यानंतर बिल भरल्यास त्यांना दंडाची रक्कम माफ करावी, वीज बिल वाटप व मीटर रिडिंगसाठी नेमलेल्या एजन्सीचे काम रद्द करून स्थानिक एजन्सीला काम देण्यात यावे, वीज ग्राहकांना वेळेवर मिटर देण्यात यावे आदी विषयावर चर्चा करून लेखी आश्वासन अधीक्षक अशोक म्हसे यांनी दिले. परंतु, चर्चेदरम्यान नव्याने नेमून दिलेल्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी रेटून धरल्याने आ. वडेट्टीवार संतप्त होऊन अधिकाऱ्यांना कंत्राट रद्द करण्यास भाग पाडले.
मोर्च्यात प्रतिभा फुलझेले, रश्मी पेशने, स्मिता पारधी, निलीमा सावरकर, मंगला लोनबले, नितीन उराडे, काशिनाथ खरकाटे, विनोद बुल्ले, वामन मिसार, शामराव इरपाते व शहरातील तसेच तालुक्यातील हजारो वीज ग्राहक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.