चंद्रपुरात वेकोलि सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:28 PM2020-02-04T16:28:16+5:302020-02-04T16:28:48+5:30
चंद्रपुरात वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीत कर्तव्य बजावून घरी जात असताना अज्ञात इसमांनी सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीत कर्तव्य बजावून घरी जात असताना अज्ञात इसमांनी सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कौशल कुमार ब्रिजेशकुमार (३४) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
कौशल कुमार ब्रिजेशकुमार हे पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा विभागात कार्यरत असून ते दररोज चंद्रपूरवरुन दुचाकीने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे कौशल कुमार कर्तव्य बजावून सोमवारी सायंकाळी दुचाकीने घरी जात होते. दरम्यान एसीसीच्या मागील बाजूनी त्याना तीन इसमांनी अडवून कोळसाची गाडी का सोडली नाही, असे म्हणत लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर वार केला. क्षणातच तिथे दुचाकीने नऊ इसम आले व त्यांनीसुद्धा कौशल कुमार यांना मारहाण केली. कौशल कुमार यांनी संधी साधून तेथून पळ काढला. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३४१, ४२७, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. कौशल कुमारवर वेकोलिच्या राजीव रतन दवाखान्यात उपचार सुरु आहे. सदर हल्ला कोळसा व्यावसायिकांकडून झाला असल्याची चर्चा सुरु आहे.