श्रीकृष्ण टॉकीज परिसरात महिलेच्या घरावर हल्ला

By Admin | Published: May 25, 2015 01:29 AM2015-05-25T01:29:30+5:302015-05-25T01:29:30+5:30

येथील श्रीकृष्ण टॉकीज परिसरातील रहिवासी वीणा पंडित यांच्या घरावर जुन्या वादातून चार ते पाच युवकांनी हल्ला केला.

An attack on the woman's house in the Krishna Tolkia area | श्रीकृष्ण टॉकीज परिसरात महिलेच्या घरावर हल्ला

श्रीकृष्ण टॉकीज परिसरात महिलेच्या घरावर हल्ला

googlenewsNext

चंद्रपूर: येथील श्रीकृष्ण टॉकीज परिसरातील रहिवासी वीणा पंडित यांच्या घरावर जुन्या वादातून चार ते पाच युवकांनी हल्ला केला. यावेळी या युवकांच्या टोळक्याने त्यांच्या घराची तोडफोड केली. यासंदर्भात लगेच विणा पंडित यांनी चंद्रपूर शहर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र तक्रार करण्याऐवजी तुम्ही आपसात तडजोड करून घ्या, असा उरफाटा सल्ला पोलिसांनी पंडित यांना दिला. या घटनेने पंडित कुटुंबात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास चार-पाच युवकांचा समावेश असलेले युवकांचे एक टोळके विणा पंडित यांच्या घरात शिरले. त्यांनी पंडित यांना शिविगाळ करीत घरातील साहित्याची तोडफोड सुरू केली. या घटनेनंतर हे युवक तेथून पसार झाले. विणा पंडित पोलीस ठाण्यात पोहचल्या. घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. आरोपींची नावेदेखील सांगितली. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई न करतान पंडित यांना दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठवले. एवढेच नव्हे तर तुमचा वैयक्तिक वाद आहे. त्यामुळे तुम्ही आपसात तडजोड करून प्रकरण मिटवा, असा सल्ला तेथे उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी विणा पंडित यांनी दिला. त्यामुळे हतबल होऊन विणा पंडित घराकडे परत आल्या. त्यानंतर त्यांनी ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी कोणतेही गुन्हे दाखल केले नव्हते. यासदर्भात शहर पोलिसांशी संपर्क केला असता, प्रकरण चौकशीत ठेवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकूणच या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पंडित यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: An attack on the woman's house in the Krishna Tolkia area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.