घरफोड्या करणारी परप्रांतीय टोळी अटकेत
By admin | Published: September 17, 2016 01:18 AM2016-09-17T01:18:12+5:302016-09-17T01:18:12+5:30
मागील चार ते सहा महिन्यांपासून चंद्रपूरसह वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ अशा जिल्ह्यात घरफोड्या करून पसार होणाऱ्या ...
सव्वाआठ लाखांच्या दागिन्यांसह पाच दुचाकी हस्तगत
चंद्रपूर : मागील चार ते सहा महिन्यांपासून चंद्रपूरसह वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ अशा जिल्ह्यात घरफोड्या करून पसार होणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून पाच दुचाकी वाहने आणि आठ लाख २६ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागीणे हस्तगत करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या कारवाईची माहिती दिली. १० सप्टेंबरला गणेशोत्सवादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींगवर असताना पडोली मार्गावरील त्रीमूर्ती धाब्यावर चार युवक बसलेले दिसले. त्यापैकी एकाजवळ काळ्या रंगाची सॅस बॅग होती. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्यांच्या बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये मोठा पेचकस, लोखंडी टॉमी, एक अॅडजेस्टेबल पाना असे घरफोडीचे साहित्य आढळले. त्यांच्याकडे नंबर प्लेट नसलेल्या दोन दुचाक्याही आढळून आल्या. यावरून संशय बळावल्याने ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता सहा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा अणि चिमूरमध्ये एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली देवून त्यांनी चोरी केलेला माल दाखवून दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उईके, सहाय्यक फौजदार दौलत चालखुरे, रऊफ शेख, पोलीस हवालदार पद्माकर भोयर, महेंद्र भुजाडे यांच्या पथकाच्या दक्षतेमुळे ही टोळी गवसली. या टोळीकडून अजून बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता संदीप दिवाण यांनी वर्तविली. पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक हेमराजसींग राजपुत उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल
या टोळीच्या म्होरक्याचे नाव खडकसींग गुंगा अलावा (३५) असे असून तो मध्यप्रदेशातील कुक्षी जिल्ह्यातील तांडा पोलीस स्टेशन अंतर्गत बराड या गावी राहणारा आहे. यासोबतच परमसिंग नवरसिंग अलावा (२४), खडकसिंग बायसिंग उर्फ रमेश अलावा (२५) आणि सुरेश अकराम सिंघार (२०) हे त्याचे साथीदार आहेत. पोलिसांनी एक पथक तयार करून या चौघांसह त्यांचे गाव गाठले असता, अलीराजपूर जिल्ह्यातील एका सोनारास दागीणे विकल्याची कबुली त्यांनी दिली. त्यावरून सोनारालाही अटक करून आणण्यात आले आहे. मध्यप्रदेश पोलिसांतही या सर्वांवर वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर ते फरार असल्याची नोंद आहे.