अट्टल मोटरसायकल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:27 AM2021-04-06T04:27:34+5:302021-04-06T04:27:34+5:30
चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच तेलंगणा राज्यातील विविध शहरांतून मोटारसायकल चोरून महाराष्ट्रातील दुचाकी तेलंगणा, तसेच तेथील दुचाकी महाराष्ट्रात विकणाऱ्या ...
चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच तेलंगणा राज्यातील विविध शहरांतून मोटारसायकल चोरून महाराष्ट्रातील दुचाकी तेलंगणा, तसेच तेथील दुचाकी महाराष्ट्रात विकणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान, या चोरट्यावर तेलंगणा राज्यात एटीएम फोडल्याचा गुन्हाही दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ११ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. जुनेद शेख इब्राईम शेख (१९) रा. आदिलाबाद असे आरोपीचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सहायक फौजदार सुरेश केनेकर. पोलीस शिपाई गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, प्रदीप मडावी, मयुर येरणे, संजय वाढई, विनोद जाधव यांचे पथक गठित करून दुचाकी चोऱट्यांवर लक्ष केंद्रित केले. दरम्यान, कोरपना येथे एक युवक दुचाकी विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा टाकून जुनेद शेख इब्राईम शेख (१९) रा. आदिलाबाद याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता तो महाराष्ट्र, तसेच तेलंगणा राज्यातील विविध शहरातून दुचाकी चोरून विकत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये विरुर तसेच बल्लारपूर पोलीस स्टेशन परिसरातील प्रत्येकी एक, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस स्टेशन परिसरातील २ तसेच ७ दुचाकी तेलंगणा राज्यातील विविध शहरातून चोरल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, या चोरट्यावर तेलंगणा राज्यात एटीएम फोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले आहे.