अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न हाणून पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:48+5:302021-03-21T04:26:48+5:30
घुग्घुस : विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून छत्तीसगडला पळवून नेण्याचा प्रयत्न घुग्घुस पोलिसांच्या सतर्कता व सायबर सेलच्या ...
घुग्घुस : विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून छत्तीसगडला पळवून नेण्याचा प्रयत्न घुग्घुस पोलिसांच्या सतर्कता व सायबर सेलच्या मदतीने हाणून पाडला. आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून दोघांना ताब्यात घेतले.
छत्तीसगडचा २१ वर्षीय विवाहित युवक घुग्घुसमध्ये दोन वर्षापासून मेसन म्हणून काम करीत होता. दरम्यान, येथील एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवून १५ मार्चला पळवून नेले. मुलगी शाळेत जाते म्हणून घरून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नसल्याने मुलीच्या आईने घुग्घुस पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी सहायक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांच्याकडे तपास सोपविला. मेघा गोखरे यांनी तात्काळ सायबर शाखेच्या मदतीने मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मिळविले असता, अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या विवाहित युवकाचे चंद्रपूर, भद्रावती ते आदिलाबाद अशा एसटी बस प्रवासाचे लोकेशन मिळाले. तात्काळ घुग्घुस पोलिसांचे पथक आदिलाबादला रवाना झाले. तेथील बसस्थानकावरून दोघांना ताब्यात घेतले. आरोपी सुनील सहाडेविरुद्ध ३७६ (अ), ३६३, पास्को अन्वयेे गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान आरोपी सुनील सहाडे हा विवाहित असून, त्याला एक मुलगा असल्याचे उघडकीस आले.