पोलिसांवर वाहन चढविण्याचा प्रयत्न
By admin | Published: December 8, 2015 12:56 AM2015-12-08T00:56:06+5:302015-12-08T00:56:06+5:30
नागपूर येथून चंद्रपूरकडे स्कोडा वाहनातून दारूची तस्करी होत असताना पोलिसांनी नंदोरी टोल नाक्यावर सदर वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता,..
दारूतस्कराचा प्रताप : नंदोरी टोल नाक्यावरील घटना
नंदोरी : नागपूर येथून चंद्रपूरकडे स्कोडा वाहनातून दारूची तस्करी होत असताना पोलिसांनी नंदोरी टोल नाक्यावर सदर वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. यात काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी नंतर सिनेस्टाईल त्याचा पाठलाग केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारू तस्करांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ५ डिसेंबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नंदोरी टोल नाक्यावर तपासणीकरीता पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यादरम्यान, एक टाटा इंडिका (एमएच ३४ के २२४५) कारला पोलिसांनी अडविले. त्याची तपासणी केली असता, सदर वाहनात १८ पेटी देशी दारू आढळून आली. ती पोलिसांनी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्याच मार्गाने एक स्कोडा वाहन आले. तिला पोलिसांनी अडविण्यासाठी बॅरिकेटस् लावण्याचा प्रयत्न केला असता, स्कोडा चालकाने क्षणाचाही विलंब न करता गाडी वेगाने मागे घेतली. मागे घेताना काही पोलीस तेथे उभे होते. त्यांचीही पर्वा करता त्यांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धावपळीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र पोलिसांजवळ यावेळी आवश्यक वाहन नसल्याने पोलीस सदर वाहनाला पकडू शकले नाहीत.
या घटनेनंतर २० मिनिटांनी नागपूरहून येणारे एक स्कॉर्पिओ वाहन टोल नाक्यावर अडविण्यात आले. यावेळी सदर वाहनाचा चालक मद्य प्राशन करून होता. वाहनामध्ये ३० पेटी देशी दारू आढळून आली. पोलीसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपी विक्की ऊर्फ रिचर्ड गॉडफी लेटर (२६) रा. संत मार्टीननगर जरीपटका नागपूर, अँथोनी क्रिष्मा ठाकूर (३८) रा. संत मार्टीननगर जरीपटका नागपूर, मनोज पाल (२५) रा. कन्हान (नागपूर) यांना अटक केली. (वार्ताहर)