युवतीचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न
By admin | Published: December 10, 2015 01:15 AM2015-12-10T01:15:15+5:302015-12-10T01:15:15+5:30
एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची ...
बल्लारपुरातील घटना : एकतर्फी प्रेमातून केले कृत्य
चंद्रपूर: एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी बल्लारपूर शहरात या सिनेस्टाईल घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.
पीडित युवती पेपर सोडविण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. त्यावेळी एका युवकाने चारचाकी वाहनातून आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने युवतीचे अपहरण केले व तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेला बेदम मारहाणदेखील करण्यात आली. या घटनेने विद्यार्थींनीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपुरातील राजेंद्रप्रसाद वॉर्डातील रहिवासी श्याम भगत याची त्याच परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीवर वाईट नजर होती. ती बल्लारपुरातील गुरूनानक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. श्याम भगत हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या मागावर होता. अनेकदा त्याने तिच्यापुढे प्रेमसंबंधाचा प्रस्तावदेखील ठेवला. मात्र सदर युवतीने त्याला धुडकावून लावले. बुधवारी दुपारी सदर महाविद्यालयीन युवतीचा परीक्षेचा पेपर होता. तो देण्यासाठी दुपारी १ वाजताच्या सुमारास ती महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात गेली.
दरम्यान, काही वेळानंतर श्याम भगत त्याच्या काही मित्रांसमवेत स्कार्पिओ वाहनाने महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात पोहोचला. तुझी आई बाहेर उभी आहे. तिला तुझ्याशी बोलायचे आहे, अशी थाप त्याने पीडित युवतीला मारली. आईचे नाव घेतल्याने युवतीदेखील तातडीने महाविद्यालयाबाहेर आली. मात्र तिला तिची आई कुठेच दिसली नाही. आपली फसगत केल्याचे तिच्या लक्षात येताच, ती परत महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता, श्याम व त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने वाहनात बसविले व वाहन बाजूच्या एका निर्जन गल्लीत नेऊन तेथे तिला मारहाण सुरू केली. श्याम एवढ्यावरच थांबला नाही तर, माझे प्रेम स्वीकार, नाही तर तुझा खून करतो, अशी धमकी देत तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळला. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून आजुबाजूचे लोक तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तिच्या श्याम व त्याच्या मित्रांच्या तावडीतून सोडविले. लगेच युवतीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी श्याम भगत व त्याच्या साथिदाराविरुद्ध भादंवि ३०७, ३५४, ३५५ (३४) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)