सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न; जाब विचारायला आलेल्या चुलतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 09:57 PM2023-07-10T21:57:09+5:302023-07-10T21:57:30+5:30
Chandrapur News माझ्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न का केला, असा जाब विचारण्यासाठी आलेल्या माेठ्या आईचीच चुलत पुतण्याने दगडाने ठेचून हत्या केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेणाच्या खड्ड्यात नेऊन टाकला.
चंद्रपूर: माझ्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न का केला, असा जाब विचारण्यासाठी आलेल्या चुलतीचीच चुलत पुतण्याने दगडाने ठेचून हत्या केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेणाच्या खड्ड्यात नेऊन टाकला. ही थरारक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथे घटना घडली. पुष्पा मधुकर ठेंगणे (६२) रा. सोनापूर असे मृतकाचे नाव आहे. तर धीरज रवींद्र ठेंगणे (२०) रा. सोनापूर असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.
पोलिस सूत्रानुसार, पुष्पा मधुकर ठेंगणे यांची सून शेतातून दुपारी घरी परत येत असताना धीरज ठेंगणे हा त्याच्या गुराच्या गोठ्याजवळ काम करीत होता. ओझे उचलण्याच्या बहाण्याने धीरज याने तिला बोलाविले. यामागे त्याचा वेगळाच हेतू होता. ती त्याच्या मदतीला जाताच त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घरी परतली. तिने ही सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितली. सासू पुष्पा ठेंगणे यांचा पारा चढला. यानंतर त्या जाब विचारण्यासाठी धीरजकडे गेल्या असता धीरज याने तिच्याशी वाद घालत तिची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन बाजूच्या शेणखताच्या खड्ड्यात फेकला आणि तो तिथून पसार झाला. आई घरी परत न आल्याने पुष्पा ठेंगणे यांचा मुलगा शोधत गेला असता त्याला शेणखड्ड्यात रक्तबंबाळ अवस्थेत ती दिसली. ती मृतावस्थेत असल्याने घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. फरार आरोपींवर भादंवि कलम ३५४, ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मनोज गदादे करीत आहेत.