दिव्यांगांना नियमित दरमहा वेतन मिळण्यासाठी प्रयत्नरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:49 AM2019-06-09T00:49:12+5:302019-06-09T00:50:25+5:30
आमदार असल्यापासून दिव्यांगांच्या सोयीसुविधांबाबत आपण कायम काम करीत आलो आहे. राज्याचा अर्थमंत्री म्हणूनदेखील अर्थसंकल्पात यासाठी कायम तरतूद केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देण्याचा आपला संकल्प असून एकही दिव्यांग यापासून वंचित राहणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आमदार असल्यापासून दिव्यांगांच्या सोयीसुविधांबाबत आपण कायम काम करीत आलो आहे. राज्याचा अर्थमंत्री म्हणूनदेखील अर्थसंकल्पात यासाठी कायम तरतूद केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देण्याचा आपला संकल्प असून एकही दिव्यांग यापासून वंचित राहणार नाही. शिवाय दिव्यांगांना नियमित मासिक वेतन मिळावे, यासाठी आपण प्रयत्नरत असल्याची माहितीही राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मूल येथील मा.सा. कन्नमवार सभागृहामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरच्या समाज कल्याण विभागामार्फत आयोजित दिव्यांग स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अटल स्वावलंबन मिशन योजनेअंतर्गत स्वयंचलित तीन चाकी सायकलचे यावेळी त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप करण्याचा निर्धार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. यासाठी अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन योजना त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात कार्यान्वित केली आहे. एखाद्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटपाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. यासंदर्भातील घोषणा २६ जानेवारीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. आज यानिमित्त आयोजित वचनपूर्ती कार्यक्रमाला हजारो दिव्यांग यांच्या उपस्थितीत यांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर व पंचायत समितीच्या सभापती पूजाताई डोहणे, पोंभुर्णा पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, गटविकास अधिकारी कपिल कलोडे, संजय गतमने, राहुल संतोषवार, विनोद देशमुख, नंदू रणदिवे, प्रमोद कडू, योगिता डबले, प्रभाकर भोयर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दोन दिव्यांगांना त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सायकलचे वाटप केले. एकाच वेळी २०० सायकलचे वाटप करण्यात आले.
ट्रायसिकल मिळणार सबसिडीवर
ट्रायसिकल वाटप करण्याची घोषणा २६ जानेवारीला केली होती. आचार संहितेमुळे या वाटपाला विलंब झाला. मात्र जिल्ह्यातील पात्र शेवटच्या दिव्यांगाला ४५ हजार किमतीची ट्रायसिकल शंभर टक्के सबसिडीवर दिली जाईल. ही तीन चाकी सायकल पूर्णत: बॅटरीवर आधारित असून दिव्यांगणा यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास किंवा तांत्रिक अडचण असल्यास सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना याबाबत अवगत करावे, असे यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यापूर्वी आमदार असताना बाबा आमटे यांच्या आनंदवनाच्यामार्फत सातशे ते आठशे लोकांना तीनचाकी सायकलींचे वाटप केले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, चांगल्या घटना सेवेतून घडत असतात. अर्थमंत्री झाल्यानंतर दिव्यांग याची मदत वाढवून हजार रुपये केली आहे. काही दिव्यांग यांनी आपल्याला ही मदत नियमित होत नसल्याचे सांगितले आहे. संबंधित विभागाला आपण या संदर्भात निर्देशित करणार असून दिव्यांगांना मिळणारी मासिक मदत त्यांना नियमित स्वरूपात मिळावी यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.