गावातील हालचालींवर राजकीय नेत्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:06+5:302021-01-04T04:24:06+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत ...
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गावातील वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. विविध पदांवर असलेले अनेक पदाधिकारी आपापल्या गावातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आपलाच कार्यकर्ता निवडणुकीत जिंकून यावा, यासाठी प्रत्येक जण कामाला लागला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागात प्रतिष्ठेची मानली जाते. पूर्वी गावात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे गावातील नेतेच आपापले पॅनल लढवून निवडणूक लढवायचे. आताही तेच आहे. मात्र गावांकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे सुरू केले आहे आणि प्रत्येक गावात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
सदस्यांसाठी सातवी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना निवडणुकीपूर्वीच माघार घ्यावी लागली., तर काही पॅनलना उमेदवार शोधताना चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, उद्या अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने काहींनी मनधरणीही करणे सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक गावातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. गावाचा विकास यावरच निवडणूक लढविली जाते. त्यामुळे जो विकास करेल तोच निवडून येतो. मात्र गावात ज्यांचे राजकीय वजन जास्त त्याच नेत्याची चलती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले आहे.
-----
इच्छुकांची मनधरणी सुरू
चंद्रपूर : ६२८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून गावातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, उद्या ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. काही गावात अविरोध निवडणूक होण्याची स्थिती असतानाही ऐनवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे हे उमेदवार अर्ज मागे घेतात की निवडणूक लढवितात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, गावातील गटातटात राजकीय आखाडे रंगत आहेत.
---
जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये दोनच पॅनल निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे थेट आमने-सामने उमेदवार आहेत. तर काही गावात तिहेरी निवडणूक रंगणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांचा हस्तक्षेप झाल्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.