भव्य तिरंग्याने लक्ष वेधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:52 PM2017-11-26T23:52:30+5:302017-11-26T23:52:44+5:30
संविधान दिनाचे औचित्य साधून रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संविधान दिनाचे औचित्य साधून रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, शहरातील विविध सामाजिक संस्था व बौद्ध मंडळातर्फे सविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये असणाºया चार हजार ३०० चौरस फुटांच्या तिरंग्याला बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष आणि भव्य तिरंग्याने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले.
संविधान सन्मान रॅलीसाठी दुपारी १ वाजतापासून शहरातील विविध भागातून नागरिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊ लागले. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास भिक्खू संघाच्या उपस्थितीत सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, रॅलीचे मुख्य संयोजक प्रविण खोबरागडे यांच्या हस्ते संविधान सन्मान रॅलीचे उदघाटन करण्यात आले. चार हजार ३०० चौरस फुटांचा तिरंगा ध्वज, हजारो बौध्द अनुयायी व सर्वात पुढे समता सैनिक दल, याप्रमाणे महारॅलीला सुरुवात झाली. जयंत टॉकीज चौक मार्गे रॅली निघून जटपुरा गेटला वळसा घेऊन पुन्हा कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहचली. तिथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत भव्य तिरंग्यासोबतच विद्यार्थ्यांनी सादर केलेली लेझीम नृत्यही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चार हजार ३०० चौरस फुटाचा तिरंगा व महारॅली बघण्यासाठी महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. विविध सामाजिक संघटनांकडून ठिकठिकाणी रॅलीत सहभागी अनुयायांना पाणी पाऊचचे वितरण करण्यात येत होते.
भरगच्च कार्यक्रम
संविधान दिनानिमित्त शनिवार आणि रविवारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या हस्ते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांच्या उपस्थित झाले. सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिध्द गायक कुणाल वराळे यांचा प्रबोधनात्मक गितांचा कार्यक्रम पार पडला.
अर्थमंत्र्यांनी केले अभिवादन
संविधान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे गिरनार चौक येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही रॅली विसर्जित झाली. त्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.