२२ पैकी १६ तेंदू घटकांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:12 PM2018-05-25T22:12:28+5:302018-05-25T22:12:28+5:30
मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे. त्यापोटी मजुरांना जवळपास पाच कोटी रुपये मिळणार आहे. शासनालाही यातून चार कोटींची रायल्टी प्राप्त होणार आहे.
तेंदूपाने घटक हंगाम दरवर्षी मे महिन्यात येतो. कंत्राटदार घटक खरेदी करून मे महिन्यात पाने गोळा करण्याचे कार्य करतात. यावर्षी शासनाने प्रति प्रमाणित गोणी म्हणजे एक हजार पुडे गोळा करण्याचा १८४५ रु. प्रमाणे दर निश्चित केला आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून गोरगरीब मजुरांना मजुरीपोटी सुमारे पाच कोटी रुपये नगदी स्वरुपात मिळणार आहे. तसेच विक्री रकमेतून शासनाकडून मजुरांना ८० टक्के रक्कम बोनसद्वारे मिळणार आहे.
तेंदूपाने संकलनाचा सर्व व्यवहार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत होतो. तेंदूपाने हे नैसर्गिक उपज असल्यामुळे व वन विभागाला कोणताही खर्च करावा लागत नसल्याने शासन गोरगरीब मजुरांच्या हिताचा निर्णय घेवून सुमारे ८० टक्के रक्कम गोळा करणाºया मजुरांच्या बँक खात्यात दिवाळीची भेट म्हणून जमा करतात. एकंदरीत गोरगरीब मजुरांना १५ दिवसांच्या हंगामात हजारो रुपये कमाईचे हे साधन असल्यामुळे याची मजुरांना आतुरतेने प्रतीक्षा असते.
यंदा पोंभूर्णा, कोठारी, गोंडपिपरी, बल्लारशाह, पळसगाव, देवाडा या सहा घटकांचा लिलाव न झाल्यामुळे तेथील गोरगरीब जनतेला रिकाम्या हाताने बसावे लागले आहे. त्यामुळे तेथील मजूरवर्गांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. तसेच पेसा कायद्याअंतर्गत या वन विभागातील लक्कडकोट, अंतरगाव, कन्हारगाव, लाम्बोरी येथील तेंदूपाने ग्रामपंचायतीला मिळत असून त्यापासून गावाच्या विकास कामासाठी खर्च केला जातो.
असे चालते काम
तेंदू हंगाम हा दरवर्षी ठरल्यावेळेस सुरू होते. या हंगामासाठी गोरगरीब जनता आतूरतेने वाट पाहत असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तेंदूपाने गोळा करण्यासाठी हातभार लावतात. पहाटे ४ वाजता उठून जंगलात जावून सकाळी १० वाजेपर्यंत पाने गोळा करतात. त्यानंतर घरी येवून ७० पानांचे पुडे तयार करतात व सायंकाळी कंत्राटदाराच्या निर्धारित संकलन केंद्रावर पोहचता करतात. त्यानंतर कंत्राटदार नगदी रक्कम मजुरांना देतो.