ऑटोमुळे आर्थिक बळासह आत्मविश्वास दुणावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:41 PM2019-06-03T22:41:30+5:302019-06-03T22:41:45+5:30
एक गृहिणी व दोन मुलांची आई, दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत, घरच्या कुणाचीही सोबत न घेता ऑटो चालविते. या गृहिणीच्या परिश्रमाला, तिच्या हिंमतीला आणि प्रचंड आत्मविश्वासाला मानावेच लागेल. बल्लारपूर येथील बीटीएस प्लांट भागात राहणाऱ्या सपना रोशन पाटील हे या आत्मविश्वासी गृहिणीचे नाव आहे.
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : एक गृहिणी व दोन मुलांची आई, दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत, घरच्या कुणाचीही सोबत न घेता ऑटो चालविते. या गृहिणीच्या परिश्रमाला, तिच्या हिंमतीला आणि प्रचंड आत्मविश्वासाला मानावेच लागेल. बल्लारपूर येथील बीटीएस प्लांट भागात राहणाऱ्या सपना रोशन पाटील हे या आत्मविश्वासी गृहिणीचे नाव आहे.
सपनाला संसाराचा गाडा हाकण्याकरिता ऑटो चालवावा लागत आहे. त्यांचे माहेर बल्लारपूरचेच. लग्न नागपूर येथील रोशन पाटील यांच्याशी झाले. पाटील हे नागपूरला आटो चालवायचे. ते बल्लारपूरला आले, ऑटो चालवू लागले व येथेच स्थायिक झाले. त्यांची पत्नी एका शाळेत कामाला जावू लागल्या. घरी ऑटो असल्याने आवड म्हणून त्यांनी आटो चालविणे शिकले. सारे नीट चालत असतानाच पती रोशनच्या डोक्याची नस दबली. आजारी पडले व त्यामुळे त्यांना ऑटो चालविणे कायमचे बंद करावे लागले. पती, दोन मुले व आपण चौघांचा संसार कसा चालवायचा हा प्रश्न सपनापुढे पडला आणि मग त्यांनी शाळेची नोकरी सांभाळून ऑटो चालविण्याचा निर्णय घेतला. लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष केले आणि शाळा संपल्यानंतर त्या सडकेवर ऑटो चालवू लागल्या. रात्री उशीरापर्यंत गावातच नव्हे तर चंद्रपूर, राजूरा, कोठारी अशा दूरवरच्या गावांत ऑटो नेतात. गेल्या दोन वर्षांपासून त्या ऑटो चालवीत आहेत. लोकांना नवल वाटते आणि कौतुकही वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. भीती दूर ठेवली. परिश्रम घेते. प्रवाशी आणि समव्यवसायी पुरुष आॅटोचालक मला मानसिक पाठबळ देतात. हेतू चांगला असला, मनमोकळेपणा असला की, कोणतेही काम साध्य होते. त्यातून आर्थिक पाठबळ मिळते. सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत शाळा. त्यांनतर ऑटो. तो किती वाजेपर्यंत त्याला वेळ नाही. असा या महिला ऑटो चालकाचा दिनक्रम सुरू आहे.
करारी आणि धाडसी
सपनाचे अंगी करारीपणा व धाडस आहे. एका प्रवाशाने ऑटोतून उतरल्यानंतर ठरलेले २० रुपये देण्याऐवजी पाचच रुपये देऊ लागला आणि वरुन मुजोरी! सपनाने त्याला खडे बोल सुनावले आणि २० रुपये वसूल केलेच! लोकांना भीवून चालत नाही. कडक व्हावेच लागते, असे वरील अनुभव सांगत त्या म्हणाल्या.