कर्करोग पीडिताच्या मदतीसाठी आॅटो संघटना सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:36 PM2018-01-22T23:36:14+5:302018-01-22T23:36:48+5:30
सावली मार्गावरील प्रवाशांना आॅटोने ने-आण करणारे सुभाष शिवराम मॅकलवार हे काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले आहेत.
भोजराज गोवर्धन ।
आॅनलाईन लोकमत
मूल : सावली मार्गावरील प्रवाशांना आॅटोने ने-आण करणारे सुभाष शिवराम मॅकलवार हे काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना उपचारासाठी पैसे कुठून आणायचे, या समस्येत कुटुंब अडकले असतानाच मूल येथील एकता आॅटो चालक असोशिएनने सामाजिक दायित्व म्हणून शहरात आर्थिक मदतीसाठी मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये ४२ हजार रुपये जमा झाले. सदर आर्थिक मदत कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे.
सावली तालुक्यातील चारगाव येथील सुभाष शिवराम मॅकलवार हे सावली ते मूल मार्गावर मागील अनेक वर्षापासून आॅटो चालवून आपल्या कुटुंबाचे पालणपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या चेहºयावर लहानसा फोड झाला. त्यामुळे सुभाषने एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीमध्ये कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरु करण्याचा सल्ला दिला. मात्र सुभाषच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शास्त्रक्रियेसाठी येणारा खर्च कुटुंबियाना झेपण्यासारखा नव्हता. त्यामुळे मॅकलवार कुटुंबियाने नागरिकांना अािर्थक मदत करण्याचे आवाहन केले.
याबाबतची माहिती मूल येथील एकता आॅटो चालक असोसिएशनच्या पदाधिकाºयांना मिळाली. दरम्यान चालकांनी बैठक बोलावून आर्थिक मदतीसाठी शहरात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बस स्थानकापासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ४२ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली.
यावेळी एकता आॅटो चालक असोशिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ रामटेके, उपाध्यक्ष सलिम कुरेशी, सचिव विनोद पिंपळकर, सहसचिव सुनील कामडी, कोषाध्यक्ष जगदिश वाढई आदी सहभागी झाले होते. या मदतीने सुभाषच्या शस्त्रक्रियेचा खर्च पूर्ण होणारा नसल्याने बँक आॅफ महाराष्टÑ शाखा सावली येथील खाते क्रं. ६०२८२२१५८६९ मदत करण्याचे आवाहन कुटुंबियांनी केले आहे.