ब्रह्मपुरीत सरासरी ७०.५२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:33 PM2018-12-09T23:33:15+5:302018-12-09T23:33:48+5:30

संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. तुरळक बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

Average 70.52 percent polling in Brahmaputu | ब्रह्मपुरीत सरासरी ७०.५२ टक्के मतदान

ब्रह्मपुरीत सरासरी ७०.५२ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देपालिका निवडणूक : ११५ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. तुरळक बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. नगराध्यक्ष पदासाठीचे आठ व नगरसेवक पदासाठीच्या १०७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. एकूण ३० हजार ८१५ मतदार होते. त्यापैकी २१ हजार ७३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात काँग्रेसच्या रिता उराडे, भाजपच्या यास्मिन लाखानी, विमापाच्या अर्पिता दोनाडकर, शिवसेनेच्या बबली दयार्पूरकर, बसपाच्या सुनिता चांदेकर, भारिपच्या उमा हजारे, अपक्ष रश्मी पेशने, पूनम नंदेश्वर यांच्यासह १०७ नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.
काही ठिकाणच्या तुरळक घटना वगळता एकंदरीत मतदान शांततेत पार पडले. ४० केंद्रांवर ही प्रक्रिया राबविण्यात आली. सदर निवडणूक काँग्रेस, विमापासाठी वर्चस्वाची तर भाजपासाठी अस्तित्वाची ठरू पाहात आहे. नगरपरिषदेवर साडेसतरा वर्ष अशोक भैयाप्रणित आघाडीची सत्ता आहे. ही सत्ता आघाडी आपल्याकडे टिकवून ठेवू शकेल की काँग्रेसच्या हातात प्रथमच नगरपरिषदेच्या सत्तेची चावी जाईल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात चमत्कार घडविणारा भाजप येथे चमत्कार घडवू शकेल का, हाही प्रश्न आहे. शिवसेना, बसपा, भारिप, अपक्ष कुठपर्यंत मजल मारतात, याविषयी मतदारांमध्ये उत्सुकता लागली आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. नवमतदारांची संख्याही मोठी होती. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रचारतोफा थंडावल्यानंतर ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत उमेदवारांनी परिसर पिंजून काढला.
प्रचार संपला, मतदानही झाले. उमेदवारांसह कार्यकर्त्यांना आता उसंत मिळाली आहे. मात्र, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदारांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.
आज मतमोजणी
ब्रम्हपुरी नगरपरिषदेसाठी रविवारी मतदान शांततेत पार पडले. सोमवारी कुर्झा रोडवरील स्व.राजीव गांधी सभागृहात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सकाळपासून सुरू होणार असून दुपारपर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. ही निवडणूक काँग्रेस, विमापा, भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.

या मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान
कुर्झा, बोंडेगाव, गांधीनगर या प्रभागातील केंद्रावर सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदार फिरकले नाही. काही मतदार कामात व्यस्त असल्याने आणि काही मतदारांना ‘बऱ्यापैकी’ अशा असल्याने ते मतदान करायला थांबून होते. मात्र मतदानाची वेळ संपायला येत असल्याने बहुतांश मतदारांनी एकाचवेळी गर्दी केली. त्यामुळे या तीन मतदान केंद्रावरउशिरापर्यंत मतदान सुरू होते.
उमेदवार व समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक
शहरात इतरत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले. मात्र पटेलनगर आणि गांधीनगर येथील मतदान केंद्रावर उमेदवार व दुसºया उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. मात्र पोलिसांनी वेळेवर येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Web Title: Average 70.52 percent polling in Brahmaputu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.