आवाळपूर - कवठाळा रस्त्यावरील पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:17+5:302021-08-29T04:27:17+5:30
बीबी : कोरपना तालुक्यातील खैरगावमार्गे कवठाळा जाणाऱ्या रस्त्यावरील खैरगुड्याजवळील पूल धोकादायक बनला आहे. पुलाला दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे नसून, ...
बीबी : कोरपना तालुक्यातील खैरगावमार्गे कवठाळा जाणाऱ्या रस्त्यावरील खैरगुड्याजवळील पूल धोकादायक बनला आहे. पुलाला दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे नसून, पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलाचे काँक्रीट पूर्णपणे निखळले असून, त्यातील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.
या पुलाचा वापर नांदा फाटा, आवाळपूर परिसरातील नागरिक, खैरगाव, कवठाळामार्गे चंद्रपूर जाण्यासाठी करतात. चंद्रपूर जाण्यासाठी दुचाकीस्वारांना हा रस्ता सोयीचा असल्याने अल्ट्राटेक परिसरातील अनेक नागरिक या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. नांदा फाटा, आवाळपूर, हिरापूर या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे; परंतु या पुलाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून फार बिकट झालेली आहे.
पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात बऱ्याचदा हा पूल पाण्याखाली जाऊन नागरिकांचा आवाळपूर, नांदा फाटा या मोठ्या गावांशी संपर्क तुटलेला असतो. या पुलाच्या जागेवर पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधून द्यावा, अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. अनेकवेळा नागरिकांनी याबाबत बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत पूल कोसळून दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल येथे उपस्थित झाला आहे. त्यामुळे पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.