भीषण; रस्त्यात गाठून केली प्रेमाची मागणी... नकार दिल्यावर केला चाकूहल्ला... पुन्हा एका तरुणीचा गेला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 08:04 PM2021-09-13T20:04:33+5:302021-09-13T20:05:55+5:30
Chandrapur News एकतर्फी प्रेमातून एका युवकाने अल्पवयीन युवतीला रस्त्यात गाठून प्रेमाची मागणी घातली. मात्र आपले त्याच्यावर प्रेमच नसल्याने तिने त्याला नकार दिला. अशातच काहीही कळायच्या आत त्याने आपला खरा क्रूर चेहरा दाखवत तिच्या पोटात चाकू भोसकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून एका युवकाने अल्पवयीन युवतीला रस्त्यात गाठून प्रेमाची मागणी घातली. मात्र आपले त्याच्यावर प्रेमच नसल्याने तिने त्याला नकार दिला. अशातच काहीही कळायच्या आत त्याने आपला खरा क्रूर चेहरा दाखवत तिच्या पोटात चाकू भोसकला. ९ सप्टेंबर रोजी रात्री ही थरारक घटना घडली. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला लगेच रुग्णालयात दाखल केले. जखम खोलवर असल्याने नागपूरला हलविले. ती मृत्यूशी झुंज देत होती. ती बरी होत असल्याची बातमीही आली होती. मात्र सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी तिची झुंज अपयशी ठरली. तिने नागपुरातच उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. या घटनेने चंद्रपूरकरांचे मन सुन्न झाले आहे. (Reached the road and demanded love ... When she refused, he was stabbed ... Again, a young woman was killed)
वनश्री अशोक आंबटकर (१७) रा.नेताजी चौक बाबूपेठ चंद्रपूर असे तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी प्रफुल्ल प्रकाश आत्राम (३२) रा. नेताजी चौक बाबूपेठ याला कलम ३०७ अन्वये अटक केली होती. आता त्याच्याविरुद्ध कलम ३०२ दाखल होणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.
वनश्री ही चंद्रपूर येथील जटपुरा गेटजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करीत होती. तिच्या घराचे काम असताना प्रफुल्ल प्रकाश आत्राम हा त्या कामावर होता. एवढीच त्याची ओळख होती. मात्र त्यानंतर प्रफुल्ल वनश्रीवर एकतर्फी प्रेम करू लागला. तो अनेकदा तिचा पाठलाग करीत होता. १ सप्टेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रफुल्ल वनश्री परिचारिका असलेल्या रुग्णालयात गेला. तेथे त्याने तिला व तिच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. तुला पाहून घेईन, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर वनश्रीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून दुर्लक्ष केले.
यानंतर वनश्रीला तिचे वडील ती काम करीत असलेल्या दवाखान्यात सोडत व नेत होते. मात्र ९ सप्टेंबरला तिचे वडील आले नाहीत. याची माहिती प्रफुल्लला लागली. ती रुग्णालयातून निघाली असता महाकाली मंदिर परिसरात असलेल्या त्रिवेणी बारसमोर प्रफुल्लने तिला एकट्यात गाठले. त्याने तिच्यावर आपले किती प्रेम आहे वैगेरे सांगून प्रेमाची मागणी घातली. मात्र त्याच्यावर प्रेमच नसल्याने वनश्रीने सरळ नकार दिला. त्यांच्या मनात काही वेगळेच होते. अशातच त्याने आपले क्रूर रूप दाखविले. त्याने आधीच आणलेला चाकू काढून वनश्रीच्या पोटावर एकापाठोपाठ तीन घाव घातले. क्षणार्धात वनश्री रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. तो तेथून पसार झाला. वनश्रीला लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविले. तिने पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. या घटनेची वार्ता चंद्रपुरात पोहोचताच समाजमन हादरले आहे. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होती. अधिक कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आभोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.
पोलिसांनी दखल न घेतल्याने वनश्रीचा बळी?
वनश्रीला प्रफुल्ल त्रास देत असल्याची तक्रार तिने रामनगर पोलीस ठाण्यात १ सप्टेंबरला दाखल केली होती. मात्र पोलीस कलम ५०४ व ५०६ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करून मोकळे झाले. त्याच दिवशी पाठलाग करणे, रस्त्यात गाठणे, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असते तर कदाचित तिचे प्राण वाचले असते. वनश्री अल्पवयीन आहे. तिचे वय १७ वर्षे असताना रामनगर पोलिसांनी १८ वर्षे नमूद केले आहे. याप्रकरणीही वेगळे गुन्हे दाखल झाले असते, अशी माहिती पोलीस सूत्रानेच दिली.