रुग्णालयातील आयुष विभाग पोरका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:26 AM2018-06-22T00:26:58+5:302018-06-22T00:26:58+5:30
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांनाही सेवा देण्यास बाध्य केले जात असल्याने या कक्षात उपलब्ध साहित्याचा वापरच होताना दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांनाही सेवा देण्यास बाध्य केले जात असल्याने या कक्षात उपलब्ध साहित्याचा वापरच होताना दिसत नाही. आयुर्वेदाला अॅलोपॅथिकप्रमाणे साईड इफेक्ट नसल्याने आजही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे रुग्णालयात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, मसाज, योग व प्राणायम आदी सेवा उपलब्ध होत आहेत. साहित्य व औषधांच्या साठ्यासह उपलब्ध आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कमतरता असल्याने अॅलोपॅथिक रुग्णांच्या सेवेत लावले जाते. परिणामी आरोग्य अधिकाऱ्यांअभावी आयुष कक्ष पोरका झाला आहे.
भारतात ऋषीमुनींच्या काळापासून आयुर्वेदाला विशेष महत्त्व दिले जात आहे. आजारावर चांगला परिणाम उशिरा होतो. आजही आयुर्वेद उपचार करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. याच उद्देशाने शासनाने उपजिल्हा रूग्णालयात आयुष कक्षाची निर्मिती केली. रुग्णालया दरदिवशी शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र त्याचा प्रचार पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. तसेच आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उपजिल्हा रुग्णालयात आंतर रुग्ण व बाह्यरुग्ण तपासणीसाठी लावले जात असल्याने लाखो रुपयाची साहित्य व औषधी धुळखात पडले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात आयुष कक्षात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक, मसाज, योगा व प्राणायम आदी सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनतेचे आयुष्यमान वाढावे व आयुर्वेदाचा वापर करता यावा, यासाठी आयुष कक्षाची उभारणी करण्यात आली. मात्र झटपट आजार बरा व्हावा, ही मानसिकता कायम असल्याने आयुर्वेदाकडे वळायला बरेच रूग्ण तयार होत नसल्याचे तालुक्यात दिसून येते. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह ९ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून आयुष विभागातही सेवा देतात. सहा वैद्यकीय अधिकाºयांच्या भरोशावर उपजिल्हा रुग्णालय सुरु आहे. मात्र ही संख्या पुरेशी नाही. वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकारी बाह्य रुग्णांवर अॅलोपॅथिकचा उपचार केला जात आहे. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी केली जात आहे. मात्र वैद्यकीय ही पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहे.
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर वैद्यकीय डॉ. बाबर यांची नियुक्ती झाली. पण, ते रुजू न झाल्याने सध्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा प्रभार डॉ. उज्वल इंदूरकर यांच्याकडे आहे. अवघ्या आठ दिवसांत रुग्णालयात त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. सकाळी १० वाजता येणारे कर्मचारी आता ९ वाजता यायला लागले आहे. कर्तव्यात तत्पर असलेले अधिकारी असल्यास रुग्णालयातील सेवा लोकाभिमुख होवू शकते. त्यामुळे रिक्त पदांची भरती करून आयुष विभागातील रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्याची मागणी होत आहे.
उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढली
येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार करणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. काही डॉक्टर उत्तम उपचार करतात. प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची मूल तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. खासगी डॉक्टरांकडे उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय, बहुतांश डॉक्टर मनमानी शुल्क घेतात. सरकारने अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, अशी मागणी आहे.