मदतीसाठी धावणाऱ्या मुलाच्या उपचारासाठी बापाची धडपड
By admin | Published: July 8, 2016 12:50 AM2016-07-08T00:50:11+5:302016-07-08T00:50:11+5:30
विजेचा धक्का लागलेल्या एका इसमाला वाचविण्यासाठी गेलेला मुलगाच गंभीररीत्या जखमी झाला.
मदतीसाठी याचना : शाळेनेही केली आर्थिक मदत
घनश्याम नवघडे नागभीड
विजेचा धक्का लागलेल्या एका इसमाला वाचविण्यासाठी गेलेला मुलगाच गंभीररीत्या जखमी झाला. मुलाच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांनी शेती विकली. पण एवढ्याने भागले नाही. आता ते मदतीसाठी दारोदार भटकत आहे. मुलगा बरा व्हावा, याच एकमेव आशेने नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील एका बापावर हा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.
रवींद्र गावतुरे हे त्या दुदैवी बापाचे नाव. शेती केवळ अर्धा एकर. तीसुद्धा असून नसल्यासारखी. रोज मजुरी करणे व आपला प्रपंच चालविणे हे त्याचे काम. रवींद्रला दोन मुले असून दोन्ही मुले तळोधी येथील लोक विद्यालयात शिकत आहेत. रवींद्रचा प्रपंच सुरळीत सुरु असताना त्याच्यावर एक भयानक आपत्ती कोसळली. रवींद्रच्या घराशेजारी एका घराचे बांधकाम सुरू होते. तिथे त्यांचा मोठा मुलगा भावेश हा खेळत होता. याचवेळी काम करणाऱ्या व्यक्तीला विजेचा धक्का लागला. या धक्क्याने तो ओरडला. या आवाजाने बाजूला खेळत असलेला भावेश मदतीला धावला. विद्युत तारेपासून त्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र या प्रयत्नात भावेशलाच विद्युत तारेने आपल्या जाळ्यात ओढले.
यात भावेश चांगलाच जखमी झाला. त्याला लगेच ब्रह्मपुरीस हलविण्यात आले. त्याची अवस्था लक्षात घेऊन ब्रह्मपुरीतील एक- दोन नामांकित रुग्णालयांनी त्यास भरती करुन घेण्यास नकार दिला. पण एका डॉक्टरांनी हिंमत दाखवली व भरती करुन घेतले.
आता भावेशवर त्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या उपचारावर आतापर्यंत एक लाख रूपये खर्च झाले आहेत. पैसे आणायचे कोठून म्हणून भावेशच्या वडीलांनी वडिलोपार्जित वाट्याला आलेली जमीन विक्रीस काढली. ती विकली, पण एवढ्यानेही भागले नाही. आता तो मदतीची याचना करीत आहे. आणखी ५० ते ६० हजारांचा खर्च अपेक्षित असून एवढी रक्कम आणायची कुठून या विचाराने रवींद्र भांबावून गेला आहे.
त्याची ही अवस्था पाहून तळोधी पत्रकार संघाचे सचिव संजय अगडे, सुनिल गौरकर, बल्लू गेटकर पुढे आले. रवींद्रला हिंमत दिली व अनेकांना मदतीची विनंती केली. भावेशची अवस्था लक्षात घेवून भावेशची शाळाही पुढे आली. शाळेने तीन- साडेतीन हजाराची मदत दिली. डॉ. सतिश वारजूकर यांनीही पाच हजार रुपये दिले. ही मदत अशीच सुरु राहिली तर रवींद्रची याचना निश्चित फलद्रूप होईल.