रक्तदानाच्या उपक्रमातून बाबूजींना आदरांजली
By admin | Published: July 3, 2016 12:48 AM2016-07-03T00:48:17+5:302016-07-03T00:48:17+5:30
लोकमत वृतपत्राचे संस्थापक-संपादक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९३ वी जयंती रक्तदान शिबिराच्या ....
३० जणांचे रक्तदान : लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक कॅम्पोनेट अप्रायसेस सेंटरचा संयुक्त उपक्रम
चंद्रपूर : लोकमत वृतपत्राचे संस्थापक-संपादक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९३ वी जयंती रक्तदान शिबिराच्या सामाजिक उपक्रमातून पार पडली. चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात ३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीआयटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे तर प्रमुख पाहुणे लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, आशा अॅडव्हटाईज एजंसीचे संचालक प्रसन्ना बोथरा, लोकमत जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत समाचार जिल्हा प्रतिनिधी अरुणकुमार सहाय उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड. बाबासाहेब वासाडे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी व स्वातंत्र्योत्तर काळात समाजासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक असा बाबूजींच्या आयुष्याचा प्रवास नवी संजिवनी देणारा आहे. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले. त्यांनी घालून दिलेल्या आर्दशाच्या वाटेवरून आज लोकमतचा प्रवास सुरु आहे.
डॉ. अशोक बोथरा यांनीही याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रास्ताविकातून गोपालकृष्ण मांडवकर यांनी बाबुजींच्या जीवनकार्याची माहिती देवून रक्तदान शिबिरामागील हेतू विषद केला. संचलन आणि उपस्थितांचे आभार लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे यांनी मानले.सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात नागरिकांनी आणि युवकांनी स्वत:हून सहभागी होऊन रक्तदान केले.
रक्तदानाने साजरा केला राजेंद्र उत्तरवारांनी वाढदिवस
शहरातील राजेंद्र उत्तरवार यांनी आज आपला वाढदिवस लोकमतच्या शिबिरात स्वेच्छा रक्तदान करून साजरा केला. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून ते स्वत:हून शिबिरात पोहोचले. शहरातील अनेक नामाकिंत व्यक्तींनीही यावेळी रक्तदान केले.
संजय वैद्य यांचे नव्वदावे रक्तदान
नगरसेवक आणि चंद्रपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय वैद्य यांनीही यावेळी रक्तदान केले. हे त्यांचे नव्वदावे रक्तदान होते. यावेळी त्यांनी ईतरांनाही रक्तदान करण्याचा संदेश दिला.