बाबुराव शेडमाके योद्धा होते
By Admin | Published: October 22, 2014 11:15 PM2014-10-22T23:15:42+5:302014-10-22T23:15:42+5:30
राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद योद्धा विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे
चंद्रपूर : राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद योद्धा विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी दरवर्षी शहीद दिन आयोजीत केला जाते. चंद्रपूर येथे मंगळवारी १५६ वा शहीद दिनी कार्यक्रम पार पडला. यावेळी विर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर तसेच आदिवासींची संस्कृती, आदिवासींचे रिती रिवाज, गोटुल संस्कृती, आदिवासी समाजाची दशा व दिशा तसेच पुढील वाटचाल या विषयावर आधारीत विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
गिरणार चौकाला लागून असलेल्या तुरुंग परिसरातील पिंपळाच्या झाडाला जिथे विर बाबुराव शेडमाके यांना इंग्रजांनी २१ आॅक्टोबर १९५८ रोजी फासावर लटकविले. त्याच जागेवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके समिती चंद्रपूर द्वारा आयोजित १५६ व्या शहीद दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष कुमरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे, प्रा. संतोष आडे, वाघु गेडाम, विनोद मसराम, उत्तम आत्राम, प्रमोद बोरीकर, राजकुमार चिकटे, राजेश उईके, नागेश कोटनाके, विशाल गड्डमवार, सुरज गोरंतवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरेश वानखेडे,, संतोष कुमरे, प्रा. संतोष आडे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमारे चिकटे यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. विशेषांकाच्या प्रकाशनाची जबाबदारी बहुजन हिताय बहुजन सुखाय युवा बहुउद्देशिय विकास संस्थेनी स्वीकारली होती.
कार्यक्रमाचे संचालन दयाराम कन्नाके यांनी केले तर आभार विनोद मेश्राम यांनी मानले.
(स्थानिक प्रतिनिधी)