चिचपल्लीचे बांबू प्रशिक्षण केंद्र रोजगार देणारे बनावे
By admin | Published: March 28, 2017 12:27 AM2017-03-28T00:27:04+5:302017-03-28T00:27:04+5:30
चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर जिल्ह्याची ओळख म्हणून संपूर्ण देशात ओळखले गेले पाहिजे.
सुधीर मुनगंटीवार : निवासी इमारतीचा पायाभरणी सोहळा
चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर जिल्ह्याची ओळख म्हणून संपूर्ण देशात ओळखले गेले पाहिजे. या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले स्वतंत्र व्यवसाय उभारावे. व्यवसायाभिमूख नव्हे तर हाताला काम देणारा जिल्हा अशी चंद्रपूरची कीर्ती सर्वदूर पोहचवावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्र व संशोधन केंद्रातील निवासी इमारतीचा पायाभरणी सोहळा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. ना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘जनतेचे शासन’ या उपक्रमांतर्गत या महत्वाच्या केंद्राची पायाभरणी वन विभागाशी संबंधित पाच नागरिकांच्या हस्ते केले. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बालपांडे, प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा उपवनसंरक्षक आर. टी. धाबेकर, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पं.स. उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावने, उपसरपंच सोमा निमगडे आदी उपस्थित होते.
मोहा फुलापासून पंचतारांकीत हॉटेलमध्ये विकता येतील, अशा काही वस्तू बनविता येतील का, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले. सुरूवातील कुदळ मारून तथा नामफलकाचे अनावरण करून इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी २ कोटींचा निधी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेला बांबू केवळ विविध वस्तू तयार करून विकण्यासाठी नाही तर या बांबूचा कौशल्यपूर्ण वापर करणारा जिल्हा म्हणून गौरव वाढविण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. या केंद्राच्या आधुनिकतेसाठी टाटा ट्रस्टसोबत आपण करार केला. ट्रस्टने केंद्राच्या आराखड्यासाठी २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.