अंगणवाडीतील आहाराकडे गरोदर व स्तनदा मातांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:37 IST2024-06-26T18:36:12+5:302024-06-26T18:37:00+5:30
उग्र वास येत असल्याने खाण्यास नकार : मूल तालुक्यातील प्रकार

Back of pregnant and lactating mothers towards Anganwadi diet
शशिकांत गणवीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : गरोदर आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहार मिळावा, जन्माला येणारे बाळ सुदृढ व्हावे, म्हणून शासनाने अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण तत्त्वे असलेला पोषण आहार वितरित करण्यात येत असतो. मात्र या आहाराला उग्र वास येत असल्याचा आरोप करीत गरोदर व स्तनदा मातांनी पोषण आहाराकडे पाठ फिरवली आहे. अंगणवाडी कार्यकत्यांनी वारंवार सांगूनही गरोदर व स्तनदा माता हा आहार घेत नसल्याचे चित्र मूल तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.
पोषण तत्त्वे असलेला हा आहार खिचडी बनवून खायचा आहे. या आहारात तेलमिश्रित एनर्जी डेन्स, मूगडाळ खिचडी प्रिमिक्स, तूरडाळ खिचडी प्रिमिक्स, मल्टीमिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन प्रिमिक्स याचा पुरवठा अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून होत आहे. मात्र, अनेक महिन्यांपासून तेलमिश्रित पदार्थ प्लास्टिक पिशवीत बंद राहत असल्याने त्यांचा उग्र वास येत आहे. परिणामतः हा आहार खाण्यास अयोग्य असल्याचे महिलांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
याबाबत मूल तालुक्यातील विरई येथील महिलांनी अंगणवाडीतील रजिस्टरवर तक्रार नोंदवली आहे. मात्र, या तक्रारीचा काहीही फायदा झाला नाही. प्रशासनाने चौकशी करून सुरू असलेला आहार बंद करावा व जुन्याच पद्धतीने कडधान्याचा आहार वितरित करावा अशी मागणी होत आहे.
महिलांचा आहार जनावरांच्या घशात
■ शासनाने हा आहार एप्रिल महिन्यांपासून सुरू केला आहे. ज्या महिलांच्या घरी जनावरे आहेत, अशा महिला आहार घरी घेऊन जात आहेत. उर्वरित महिलांनी या आहाराकडे पाठ फिरवली आहे.
■ गरोदर माता व स्तनदा मातांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून शासन प्रयत्न करीत असले तरी अंगणवाडी केंद्राअंतर्गत वाटप होत असलेला आहार खाण्यायोग्य नसल्याने तो जनावरांना चारला जात आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच बगल मिळत असून ज्या महिलांना आहार दिला जातो त्याच जर खात नसतील तर योजना काय कामाची? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.
"स्तनदा मातांना अंगणवाडी केंद्राअंतर्गत वाटप होत असलेला आहार निकृष्ट असून खाण्यायोग्य नाही. याबाबत अंगणवाडी केंद्रातील रजिस्टरवर तक्रार नोंदविली आहे."
- अश्विनी प्रशांत निकोडे, स्तनदा माता, विरई