लसीकरणाकडे पेंढरीवासीयांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:55+5:302021-08-28T04:31:55+5:30
पेंढरी (कोके) : कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना सोयीचे व्हावे, म्हणून ग्रामीण भागातील ...
पेंढरी (कोके) : कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना सोयीचे व्हावे, म्हणून ग्रामीण भागातील गावांमध्येही लसीकरण केंद्र ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राच्या मदतीने आयोजित करण्यात आले. मात्र, येथील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जडवाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
जुन्या वाहनांची तपासणी करा
ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कन्हाळगाव येथील वीजपुरवठा खंडित
नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील विद्युत पुरवठा मागील काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत असल्यामुळे गावातील गरोदर महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती, विद्यार्थी तसेच गावातील समस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान वीज कंपनीने विशेष लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
नेटपॅकचे दर कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : शाळा-महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना नेट पॅक मारावा लागत आहे. साधरणात: अडीचशेच्या जवळपास खर्च येत आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात नेटपॅक उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
बार्टीचे मोफत प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने मागील वर्षी बार्टीतर्फे मोफत स्पर्धा परिक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. कोरोनाने अद्यापही शिकवणी वर्ग घेण्यास मुभा नसल्याने यंदाही बार्टीतर्फे मोफत प्रशिक्षण राबविण्याची मागणी होत आहे.
तारसा येथील नाल्यांचा उपसा करा
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सह इतर वाॅर्डामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या उपसा न केल्याने तुडुंब भरलेल्या आहेत. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.