लाडज घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष
By Admin | Published: July 13, 2016 02:01 AM2016-07-13T02:01:24+5:302016-07-13T02:01:24+5:30
ब्रह्मपुरी जिल्ह्यातील लाडज येथील नाव बुडणयच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक : यंत्रणेला दिले दक्षतेचे आदेश
चंद्रपूर : ब्रह्मपुरी जिल्ह्यातील लाडज येथील नाव बुडणयच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रशासनातील बचाव पथक केव्हाचेच दक्ष असले तरी मंगळवारच्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्वांना पुन्हा दक्षतेचे आणि तत्पर राहण्याचे आदेश बैठकीतून दिले आहे.
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. या सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून मार्गही बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात आपतग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी तातडीच्या बैठकीतून दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता जी.एम.शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, दूगार्पूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता बोरुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे जिथे परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे, तेथे तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरीकांच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. इरई किंवा अन्य धरणातून पाणी सोडावे लागत असल्यास नदी काठावरील गावातील नागरिकांना एसएमएसद्वारे सूचना दिली जावी, असे त्यांनी सुचविले. (जिल्हा प्रतिनिधी)