बडतर्फ ६२ स्वयंपाकिणींच्या प्रश्नावर १५ दिवसात निर्णय घेणार
By admin | Published: July 23, 2015 12:44 AM2015-07-23T00:44:11+5:302015-07-23T00:44:11+5:30
जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून ...
सीईओंच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता : आठवडाभरापासून सुरू होते आंदोलन
चंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून काढल्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले उपोषण बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. येत्या १५ दिवसात या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावरच आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
मागील १३ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर या ६२ बडतर्फ स्वयंपाकीनी आणि मदतनिसांचे आमरण उपोषण सुरु होते. मागील सत्रात कामावरून कमी केलेल्या या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी विविध पंचायत समिती स्तरावर आंदोलने सुरु होती. दरम्यानच्या काळात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली होती. त्यात १० जुलै २०१४ च्या शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन संबंधितांना कामावर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र त्यांना कामावर घेण्यात न आल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी १३ जुलैपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आरंभले होते. या काळात चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत होता.
दरम्यान, २० जुलैला शिक्षणाधिकारी देशपांडे यांना उपोषण मंडपात पाठवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. मात्र तो विफल ठरला. बुधवारी परिस्थिती अधिकच चिघळून आंदोलनकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर येवून घोषणाबाजी सुरू केली.
जेलभरो आंदोलनही पुकारले. परिस्थिती लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांनी शिष्टमंडळास आपल्या कक्षात चर्चस बोलावून बाजू ऐकून घेतली. येत्या पंधरा दिवसात यावर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मात्र लेखी आश्वासनाशिवाय हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यावर लिंबूपाणी घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)