घोडा रथयात्रेच्या मिरवणुकीने भारावले बालाजीभक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:34 PM2019-02-18T22:34:43+5:302019-02-18T22:35:03+5:30
३९२ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ३९२ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथ यात्रेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
पेशवाईच्या काळात जीर्णोद्वार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९२ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसलेकालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४६ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावागावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.
रविवारी रात घोडयाच्या मिरवणुकीत यावर्षी प्रथमच पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती होती. सोबत माजी आमदार मितेश भांगडीया, आमदार कीर्तीकुमार भांगडियाही उपस्थित होते. मिरवणुकीपूर्वी विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. रात्री १२ वाजता भक्तीमय वातावरणात फटाक्याच्या आतषबाजीने मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. ही मिरवणूक बालाजी मंदिर ते नेहरू चौक, अंहिसा चौक, बाजार ओळ, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक, अशी फिरत सकाळी ५.३० वाजता बालाजी मंदिरात विसर्जित झाली. या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील हजारो बालाजीभक्त मोठ्या उसाहात सहभागी झाले होते. भक्ती संगीताच्या तालावर बालाजी भक्तांची पावले थिरकत होती. गोविंदा-गोविंदाचा गजर सातत्याने सुरू होता. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या यायात्रेचे यावर्षीचे विशेष आकर्षण बालाजी मंदिराच्या आवारातील दिल्ली येथील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूरनगरीत मनोरजंनाच्या साधनांसह, मौत का कुआ, आकाश पाळणे, अशा अनेक प्रकारच्या दुकानासह मिनी सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे. पालिका व श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटी यांनी भक्तासाठी विविधसोई पुरवल्या आहेत.
बालाजी भक्तनिवासासाठी १५ कोटी देणार -जयकुमार रावल
विदर्भाचा तिरूपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिमूर बालाजी महाराजांच्या यात्रेत प्रथमच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थिती दर्शवून बालाजीचे दर्शन घेत विकास कामाची पाहणी केली व बालाजी महाराज भक्त निवासासाठी १५ कोटी निधी देण्याची घोषणा केली. दरम्यान राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी श्रीहरी बालाजी देवस्थानची वेबसाइट व गुगल अॅपचे उदघाटन केले तर देवस्थान कमिटीच्या वतीने ना. जयकुमार रावल, व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार मितेश भांगडिया, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, वसंत वारजूकर, डॉ. दिलीप शिवरकर, विनोद अढाल, बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष निलम राचलवार, मंगेश भलमे, बबनराव बोथले उपस्थित होते.