बालाजीभक्तांनी फुलली क्रांती नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:44 PM2019-02-20T22:44:44+5:302019-02-20T22:45:03+5:30
रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. आज बुधवारी दुपारी १२ ते ३ वाजता घोडा रथयात्रेचा गोपाल काला हजारो अबालवृद्ध, युवकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदाच्या गजराने क्रांतीनगरी दूमदुमून गेली होती. पंचक्रोषीतील हजारो बालाजी भक्ताच्या उपस्थितीने क्रांती नगरी फुलली होती.
पेशवाईच्या काळात जीर्णाद्वार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९२ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसलेकालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४६ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावागावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.
बुधवारी बालाजी महाराजाच्या घोडा रथयात्रेच्या नवरात्र समाप्तीला गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता आज सकाळपासूनच बालाजी भक्तांचे आगमन बालाजी मंदिर परिसरात होण्यास सुरूवात झाली. दुपारी २ वाजतापर्यंत पूर्ण परिसर बालाजी भक्तांनी फुलून गेला होता. खोडे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर गोपाल काला करण्यात आला. यावेळी मंदिराचे अध्यक्ष निलम राचलवार, अॅड.चंद्रकांत भोपे, डाहुले, भलमे, डॉ. दीपक यावले आदी उपस्थित होते. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या घोडा रथयात्रेमध्ये बालाजी मंदिराच्या आवारात माजी आमदार मितेष भांगडिया, आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या वतीने गुजरात येथील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे.
ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूर नगरीत मनोरजंनाच्या साधनासह, मौत का कुआ, आकाश पाळणे, मिनी सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
बुधवारी गोपालकाल्यानिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिकेने भक्तासाठी विविध सोई पुरवल्या आहेत. दोन ठिकाणी पोलिसांनी मदत केंद्र उभारले आहे.